तालुक्यातील बऱ्याच गावांच्या रस्त्यांची चाळण उडाली असून रस्ते बनविण्यात आले आहेत कि खड्डे काढण्यात आले आहेत? असा उपहास आता नागरिक करताना दिसत आहेत. वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही या खड्ड्यांचा त्रास आता सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील बेळगुंदी भागातही अशीच खड्ड्यांची समस्या उद्भवली आहे. येथील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून खड्ड्यात रस्ते आहेत कि रस्त्यावर खड्डे पडले आहेत असा प्रश्न या अस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला पडत आहे. तालुक्याच्या पश्चिमेकडे नेहमीच दमदार पाऊस पडत असतो. त्यामुळे रस्त्यांतही खड्ड्यांची संख्या वाढली आहे.
याशिवाय यंदे खुट पासून शौर्य चौक पर्यंत कित्येकवेळा रास्ता बनविण्यात आला आहे. परंतु एकाच पावसात हा रस्ता धुऊन पुसून आणि वाहून जातो. शौर्य चौकानंतर जवळपास पाईप लाईन रोडपर्यंत रस्त्याची अवस्था बिकट झालीअसून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
शौर्य चौकापासून लक्ष्मीटेकडी पर्यंतचा भाग हा कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो. मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या काही अधिकाऱयांचे बंगले इथे आहेत. शिवाय याचठिकाणी इन्फन्टरी स्कुल आहे. शिवाय मिलिटरी हॉस्पिटलची याच भागात आहे. या रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांची रस्ते भरलेले आहेत. परंतु कॅन्टोन्मेंट विभागाचे या रस्त्याच्या डागडुजीकडे दुलर्क्ष झालेले आहे. गणेशपुर पासून ते राकस्कोप धरणापर्यंत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातही वाढले आहेत.
या रस्त्यांच्या डागडुजीकडे लोकप्रतिनिधींचे तसेच कॅन्टोन्मेंट विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परंतु याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. मागील वर्षीपासून होत असलेल्या धुवाधार पावसामुळे रस्त्याची ही दुरवस्था झाली आहे. शिवाय या रस्त्यावरून वाहतुकीचे प्रमाणही खूप वाढले आहे. अशातच बेळगुंदी भागातून बॉक्सिंगची वाहतूक करणारे अवजड ट्रकही याच रस्त्यावरून मार्गस्थ होतात.
गेल्या काही दिवसांमध्ये राकस्कोप भागात धुवाधार पाऊस पडला. दुसरीकडे मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रासदायक अनुभवही वाहनधारक, प्रवाशांना घ्यावा लागत आहे. बेळगुंदी पेट्रोलपंप जवळपासच्या मार्गावर अक्षरश: खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. प्रत्येक मार्गावर खड्ड्यांची संख्या वाढत आहे. हे खड्डे जवळपास अर्धाफुट खोल आणि रुंद आहेत. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले असून वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना एखाद्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
मागील वर्षी या रस्त्यांची डागडुजी करण्याच्या नावाखाली केवळ वरवर मलमपट्टी केल्याप्रमाणे पॅचवर्क करण्यात आले होते. परंतु यावर पसरविण्यात आलेली खाडी ही दोनच दिवसात इतरत्र पसरली आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे रस्त्यांची अवस्था झाली. एक खड्डा चुकवण्यासाठी गेला तर दुसऱ्या खड्यात जाणार निच्छित त्यामुळे अपघातातही वाढ झाली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या पडलेल्या खड्ड्यांची संख्या अधिक आहे. शिवाय राकसकोप मार्गावरून महाराष्ट्रातील काही गावांनाही हा रस्ता जोडला जातो. त्यामुळे त्याठिकाणच्या रस्त्यावरील वाहतुकीत वाढ झाली आहे. बेळगाव ते राकसकोप दरम्यान च्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
या रस्त्याच्या डागडुजीसाठी युवा वर्ग पुढारला असून येत्या १५ दिवसात या रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात यावे, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील युवा वर्गाने दिला आहे.