डीसीसी बँकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशा राष्ट्रीय पक्षाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. परंतु समितीच्या नेत्यांमध्ये या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नाही आहेत. सीमाभागातील सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येक निवडणुकीत समितीची पताका फडकावत ठेवणे गरजेचे आहे. परंतु समिती नेत्यांमध्ये याबाबत कोणत्याही प्रकारचे गांभीर्य दिसून येत नाही. जोवर समिती नेत्यांना याबाबत कार्यकर्ते किंवा बाहेरील व्यक्तींकडून जाणीव करून देण्यात येत नाही, तोवर समिती नेत्यांना जाग येत नाही.
डीसीसी बँकेतील बहुतांशी मतदार हे मराठी संस्थेशी आणि मराठी मतदार आहेत. परंतु तरीही समितीच्या वतीने या निवडणुकीसाठी उमेदवार उभा करण्यात येत नाही. याशिवाय डीसीसी बँकेत मतदान करणारे तालुक्यातील अनेक कृषीपत्तीन संस्थेतील मतदार हे मराठीच आहेत. खानापूर तालुक्यात डीसीसी बँकेवर जर मराठी माणूस निवडून येत असेल तर संपूर्ण तालुक्याच्या दृष्टीने मराठी उमेदवार का निवडून येणार नाही? आणि हा विचार समिती नेते का करत नाहीत? असा प्रश्न मराठी जनतेतून उपस्थित केला जात आहे.
प्रत्येक निवडणुकीत सेटलमेंट करणं, राष्ट्रीय पक्षांशी बांधिलकी जपणं, आणि प्रत्येक वेळी निष्क्रिय राहणं हे समिती नेत्यांच्या अंगवळणी पडले आहे.राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला बेळगाव डी सी सी बँक मधून निवडून देण्याचा निर्धार झाला असून पहिला हप्ता देखील पोहोचला आहे अशीही माहिती आहे.
आता ग्रामपंचायत निवडणूका आणि महानगरपालिका निवडणूका जवळ येत आहेत. यादरम्यान समिती नेत्यांच्या बैठका सुरू होतात. परंतु मराठी माणसाच्या हिताच्या दृष्टीने कोणतेही निर्णय घेण्यात येत नाहीत. याउलट राष्ट्रीय पक्षांना पूरक असे निर्णय आतल्या गोटात शिजत असतात. आणि हेच समितीला महागात पडत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती ही लढाऊपणासाठी ओळखली जात होती. परंतु हे लढाऊपणच हरवत चालले आहे. विशेषतः बेळगाव ग्रामीण भागात श्रीराम सेना, बजरंग दल व कॉग्रेस वाढत आहे मात्र समिती कमकुवत ठरत आहे.
ही एकंदर परिस्थिती लक्षात घेता समितीला एकतर खंबीर नेतृत्वाची गरज आहे. समितीमध्ये सध्या शांतता असून नेतृत्वबदलाची मागणी जोर धरत आहे. समिती नेत्यांमध्ये अजूनही ठोस निर्णय घेण्यात येत नाही कोणतेच मोठे कार्यक्रम राबवताना दिसत नाहीत . नेतृत्वबदल करण्याबाबत समितीची पुनर्रचना बाबत कोणतीही हालचाल दिसून येत नाही. यामुळे युवावर्ग राष्ट्रीय पक्षांच्या वळचणीला जात आहे. यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला आपले वर्चस्व राखण्यासाठी पुनःश्च हरिओम करायची गरज आहे.