गेल्या कांही वर्षांपासून सिव्हिल हॉस्पिटल रोड अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड या मार्गाचेही महत्त्व वाढले असून या रस्त्यावरील जमिनीचे दर झपाट्याने वाढले आहेत. हा रस्ता केली हॉस्पिटल बरोबरच राष्ट्रीय महामार्गाला जोड असल्यामुळे शहरांमध्ये प्रवेश करणारा हा मुख्य रस्ता ठरू लागला आहे. त्यामुळे भविष्यातही या रस्त्याचे महत्त्व वाढणार पर्यायाने जमिनीच्या किंमती आणखी वाढणार हे निश्चित आहे.
पूर्वी सिव्हिल हॉस्पिटल रोड तसेच एसपी ऑफिस रोडला लागून स्मशानभूमी असल्यामुळे या ठिकाणी जागा घेण्यास नागरिक धजावत नव्हतेच, याचबरोबर व्यावसायिक देखील पुढे येत नव्हते. मात्र गेल्या कांही वर्षांमध्ये या दोन्ही रस्त्यांचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड रस्त्यावर आता आलिशान इमारतींवर बरोबरच नामांकित कंपन्यांचे शोरूम त्याचबरोबर मोठी हॉटेल्स व लॉजिंग झाली आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या रस्त्यावरील जमिनीचे दर झपाट्याने वाढत चालले आहेत. कांही वर्षांपूर्वी शहराच्या बाहेरील भाग म्हणून येथील मालमत्ताधारकांना तसेच जागांच्या मालकांना ग्राहक मिळत नव्हते. मात्र आता येथील जागा खरेदी करण्यासाठी चढाओढ लागल्याचे दिसून येते. मुद्रांक व नोंदणी खात्याने 13 वर्षांपूर्वी आंबेडकर रोडवरील निवासी मिळकतीचे दर 1,670 रुपये प्रति चौरस फूट तर व्यापारी जागांचा दर 1,770 रुपये प्रति चौरस फूट इतका निश्चित केला होता. हा दर आता निवासी मालमत्तांसाठी 7,200 आणि व्यावसायिक जागांसाठी 10,080 रुपये प्रति चौरस फूट झाला आहे.
डॉ आंबेडकर रोडप्रमाणे क्लब रोड येथील मालमत्ता आणि जागेचे दर गेल्या 23 वर्षात जवळपास 70 हून अधिक पटीने वाढले आहेत. या ठिकाणचा निवासी मालमत्तांचा दर 5,610 रुपये प्रति चौरस फूट आणि व्यावसायिक जागांचा दर 7,454 रुपये प्रति चौरस फूट इतका आहे. मुद्रांक व नोंदणी खात्याने हा दर निश्चित केला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण काही वर्षांपूर्वी झाले त्याचाच परिणाम दरांवर दिसून येत आहे.
एसपी ऑफीस रोडचे रूंदीकरण होण्याबरोबरच जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय बरोबरच पोलीस आयुक्त कार्यालय आणि महापालिका कार्यालय या रस्त्यावरच झालेली असल्यामुळे येथील जागांचे दर देखील वाढले आहेत.एसपी ऑफीस कार्यालयापासून कोल्हापूर सर्कलपर्यंतच्या निवासी मालमत्तांचे दर 3,650 रुपये प्रति चौरस फूट तर व्यवसायिक जागांचा दर 6,010 रुपये प्रति चौरस फूट इतका झाला आहे.