कोरोनाचे संकट लक्षात घेऊन विजयादशमी दिवशी काढण्यात येणार्या सीमोल्लंघनाच्या पारंपारिक पालखी मिरवणुकीत फक्त 15 जणांचा सहभाग असेल. तेंव्हा सालाबादप्रमाणे यावेळी देखील या मानाच्या मिरवणुकीला परवानगी देण्यात यावी यासाठी चव्हाट गल्लीतील ज्योतिर्लिंग सासन काठी पदाधिकाऱ्यांनी मार्केट पोलीस निरीक्षकांशी चर्चा केली.
मार्केट पोलीस निरीक्षकां संगमेश शिवयोगी यांच्याशी झालेल्या चर्चेप्रसंगी चव्हाट गल्लीतील ज्योतिर्लिंग सासन काठी पदाधिकाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भावाचे संकट असले तरी शहरातील सीमोल्लंघनाच्या पालखीची परंपरा पूर्वापार चालत आली आहे.
त्यामुळे ही परंपरा खंडित होणार नाही याची काळजी घेऊन यंदाच्या पालखी मिरवणुकीला परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली. कोरोना संदर्भातील सरकारच्या सर्व नियमांचे पालन करून फक्त 15 जणांच्या सहभागाने साध्या पद्धतीने ही मानाची पालखी मिरवणूक काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यंदाची ज्योतिर्लिंग अर्थात देवदादा सासन काठी पालखी मिरवणूक चव्हाट गल्ली येथून प्रारंभ होऊन शेट्टी गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, बसवान गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौक, बेननस्मीथ हायस्कूल रोड आणि सेंट झेवियर हायस्कूल मार्गे सीमोल्लंघनाच्या ठिकाणी ज्योती कॉलेज मैदानावर समाप्त होईल अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीत मार्केट पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करतेवेळी सुनिल जाधव, लक्ष्मण किल्लेकर, नागेश नाईक, प्रताप मोहिते, बाळू नाईक, जोतिबा धामणेकर, अभिजित आपटेकर, श्रीनाथ पावर, रोहन जाधव, विनायक पवार, व चव्हाट गल्लीतील ज्योतीलिंग सासन काठीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीनंतर मानाच्या देवदादा सासन काठी मिरवणुकीच्या मार्गची मार्केट पोलिस निरीक्षककडून पाहणी करण्यात आली.