कोरोनाच्या संकटाशी निर्भयपणे सामना करणाऱ्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या बेळगांव विमानतळाने आता हळूहळू पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्य करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. गेल्या महिन्यात तब्बल 23 हजार प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला आहे.
कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन मध्यंतरी देशातील विमानसेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या देशव्यापी बंदचा विपरीत परिणाम अन्य विमानतळांप्रमाणे बेळगांवच्या सांबरा विमानतळाला ही भोगावा लागला होता.
विमान सेवा सुरू झाल्यानंतरही या विमानतळावरील प्रवाशांची संख्या चिंताजनक होती. तथापि बेळगांव विमानतळाचे संचालक राजेश कुमार मौर्य त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपक्रम आणि उपाय योजना राबविण्यात आल्यामुळे अल्पावधीत बेळगांव विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत समाधानकारक वाढ झाली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) बेळगांव विमानतळाने गेल्या पांच महिन्यात प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा आपला चढता आलेख कायम ठेवला आहे. सदर विमानतळावरून गेल्या मे महिन्यामध्ये फक्त 439 प्रवाशांनी प्रवास केला होता. तथापि जून महिन्यापासून प्रवाशांच्या संख्येमध्ये इतक्या झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली की सप्टेंबरअखेर प्रवाशांच्या संख्येने 23 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
गेल्या मे ते सप्टेंबर महिन्यादरम्यान बेळगांव विमानतळावरून प्रवास केलेल्या प्रवाशांची आकडेवारी थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे. मे 2020 -439 प्रवासी, जून -9,811 प्रवासी, जुलै -14,162 प्रवासी, ऑगस्ट -17,917 प्रवासी आणि सप्टेंबर -23,175 प्रवासी.