बेळगाव तालुका भागातील बेनकनहळ्ळी येथील केएचबी कॉलनीत पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. येथील रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या परिसरात पायाभूत सुविधांची सोय करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
बेनकनहळ्ळी येथील केएचबी कॉलनीत २०१२-१३ साली ७०० हुन अधिक घरांचे वाटप करण्यात आले आहे. या वसाहतीत १०० हुन अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत. परंतु याठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. यासाठी येथील रहिवाशांना संघर्ष करावा लागत आहे. या कॉलनीत केवळ घरे बांधून देण्यात आली आहेत.
परंतु पिण्याचे पाणी, पथदीप, रस्ते, गटारी, कचरा विल्हेवाट, वाहतुकीची सुविधा यासारख्या अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. अनेकवेळा निवेदन सादर करून आजपर्यंत कोणतीही सुविधा पुरविण्यात आली नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.
शिवाय गेली ८ वर्षे हा त्रास येथील नागरिक सहन करत असून पाण्याअभावी आठवड्यातून केवळ एकदा अंघोळ करण्याची वेळ आली असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. याठिकाणी अनेक घरे रिकामी आहेत.
या घरांच्या आजूबाजूला गावात उगवले आहे. आजपर्यंत कोणीही येऊन लक्ष पुरविले नाही. त्यामुळे या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करत गुरुवारी या परिसरातील नागिरकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.