मोकाट जनावरांचे मृत्यू रोखण्यासाठी आणि प्रवाशांच्या हितार्थ शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 च्या दुतर्फा संरक्षक कठडे अथवा बॅरिकेड्स घालण्यात यावेत, अशी मागणी “हा माझा धर्म” या संघटनेने केली आहे.
बेळगाव शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांच्या नोकरीने मोकाट जनावरे मृत्युमुखी तर पडत आहेतच शिवाय प्रवाशांचा जीव देखील धोक्यात येत आहे. याला आळा घालण्यासाठी शहरानजीक महामार्गाच्या दुतर्फा बॅरिकेड्स घालण्यात यावेत अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. तथापि राष्ट्रीय महामार्ग खात्यासह संबंधितांचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भरधाव वाहनांच्या ठोकरीने जनावरे मृत्युमुखी पडण्याचे अथवा गंभीर जखमी होण्याचे सत्र सुरूच आहे. अपघाती मृत्युमुखी पडलेले जनावर अथवा जखमी झालेल्या जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील गस्ती पथक सातत्याने काकती येथील “हा माझा धर्म” या प्राणी दया व सेवाभावी संघटनांचे सहकार्य घेत असते. गस्ती पथकाकडून बोलावणे येताच या संघटनेचे प्रमुख विनायक केसरकर हे हातातील काम सोडून वेळी-अवेळी महामार्ग गस्ती पथकाच्या मदतीला धावून जात असतात.
महामार्गावरील मृत जनावराचे कलेवर रस्त्याशेजारी नेऊन ठेवणे, जखमी जनावरांवर प्राथमिक उपचार करून यांना पशु चिकित्सालयाकडे धाडणे जखमी मोकाट गाईंना गोशाळेत धाडणे या पद्धतीची सेवा हा माझा धर्म संघटनेतर्फे केली जाते. गेल्या बुधवारीच या संघटनेने यमुनापूरनजीक महामार्गावर वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या म्हशीला जीवदान दिले.
शहरानजीकच्या महामार्गावर होणारे मोकाट जनावरांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी आणि पर्यायाने प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ नये यासाठी महामार्गाच्या दुतर्फा बॅरिकेड्स घालण्यात यावेत. ज्यामुळे मोकाट जनावरे महामार्ग ओलांडणार नाहीत, असे हा माझा धर्म संघटनेचे प्रमुख विनायक केसरकर यांचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न चालविले आहेत. राष्ट्रीय महामार्ग खाते, जिल्हा प्रशासनासह थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत त्यांनी बॅरिकेड्स संदर्भातील आपली तक्रार वजा मागणी पोहोचवली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून तर त्यांना त्याची पोचपावतीही मिळाली आहे.
तथापि दुर्देवाने अद्यापपर्यंत कोणतीच आवश्यक कार्यवाही झालेले नाही. दरम्यान एखाद-दुसऱ्या जनावराचा बळी जाण्याचा अथवा जनावरे जखमी होण्याच्या घटनांचे संघटनेकडून घटनास्थळी जाऊन जनावरांवर उपचार करण्याचे सत्र सुरूच आहे. आपल्या तक्रारवजा मागणी संदर्भात विचारणा केल्यास आवश्यक क्रम घेण्यात आल्याचे सांगून तोंडाला पाने पुसली जात असल्याचेही केसरकर यांनी खेदाने सांगितले.
मोकाट जनावरांचे मृत्यू रोखण्यासाठी आणि प्रवाशांच्या हितार्थ शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 च्या दुतर्फा संरक्षक कठडे अथवा बॅरिकेड्स घालणे अत्यंत गरजेचे आहे असे महामार्ग परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे देखील मत आहे. बॅरिकेट्स घातल्या मुक्या जनावरांचे प्राण तर वाचतीलच शिवाय गंभीर अपघाताचा धोका ही टळणार आहे. तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.