Wednesday, January 22, 2025

/

डीसीसी बँकेच्या 10 जागा बिनविरोध : पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांची माहिती

 belgaum

बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमधील 16 जागांपैकी 10 जागा बिनविरोध झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन रमेश कत्ती, माजी मंत्री उमेश कत्ती, आमदार भालचंद्र जारकीहोळी आदी सर्व भाजप नेत्यांनी संयुक्तरित्या दिली.

शहरात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपरोक्त माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले की, बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (डीसीसी बँक) पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमचे कसोशीने प्रयत्न होते. तथापि खानापूर, बैलहोंगल आदी कांही ठिकाणी आमच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. तथापि अद्यापही आम्ही आमचा आशावाद सोडलेला नाही. उर्वरित सहा जागा देखील बिनविरोध होतील यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. यावेळीची ही निवडणूक बिनविरोध करून विक्रम प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही सवदी यांनी स्पष्ट केले.

माजी मंत्री उमेश कत्ती यांनी यावेळी बोलताना आम्ही सर्वजण संघटित होत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सर्वजण मिळून सर्वानुमते प्रत्येक निर्णय घेत आहोत, अशी माहिती दिली. आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक आम्ही विरोध करून दाखवू असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी व्यासपीठावरील नेतेमंडळींनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.Bjp leaders dcc bank

आजच्या या पत्रकार परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य हे की लक्ष्मण सवदी, रमेश कत्ती, उमेश कत्ती, भालचंद्र जारकीहोळी, आण्णासाहेब जोल्ले हे सर्व भाजप नेते पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलेले पहावयास मिळाले. रमेश कत्ती यांनी बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची नांवे वाचून दाखविली. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये लक्ष्मण सिद्धाप्पा सवदी (अथणी तालुका), अण्णासाहेब मारुती कुडीगुडी (रायबाग तालुका), अण्णासाहेब शंकर जोल्ले (चिकोडी तालुका), रमेश विश्वनाथ कत्ती (हुक्केरी तालुका), शिवानंद सिंगाप्पा डोणी (गोकाक तालुका), राजेंद्र चंद्रशेखर अंकलगी (बेळगांव तालुका), विश्वनाथ उर्फ आनंद चंद्रशेखर मामनी (सौंदत्ती तालुका), अशोक राचगौडा अवकण्णावर (आयएपीसीएमएस विभाग अथणी ता.), सुभाष गिर्‍याप्पा ढवळेश्वर (औद्योगिक संस्था विभाग), निळकंठ बसवराज कप्पलगुद्दी (कंझ्यूमर सोसायटी विभाग) आणि पंचनगौडा बसनगौडा द्यामनगौडर (दूध संकलन आदी इतर संस्था विभाग) यांचा समावेश आहे.

बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख शनिवार दि. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. या कालावधीपर्यंत उर्वरित सहा जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान बँकेच्या सर्वच्या सर्व 16 जागा अविरोध करण्याचा आशावाद उपस्थित सर्व भाजप नेत्यांनी व्यक्त केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.