बेळगावच्या खासदारपदी कोणता नवा चेहरा?
भाजप हायकमांड घराणेशाही चालवणार की इतर उमेदवारांना संधी देणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
खासदार सुरेश अंगडी यांचे निधन होऊन दोनच दिवस उलटले आहेत. परंतु बेळगावच्या राजकारणात अंगडींच्या नंतर वारसदार कोण? या चर्चेचा ऊत आला आहे. सुरेश अंगडी यांच्या धक्कादायक निधनानंतर दोन दिवसाच्या अवधीतच पोटनिवडणुकीच्या चर्चा बेळगावमध्ये सुरु झाली आहे. या निवडणुकीत कोण आपले नशीब आजमावणार आणि भाजपा हायकमांड कोणाला उमेदवारी जाहीर करणार याकडे साऱ्यां चर्चेचे लक्ष वेधले आहे.
तब्बल 15 वर्षांहून अधिक काळ बेळगावच्या खासदारपदी विराजमान असलेल्या सुरेश अंगडी यांच्यानंतर बेळगावमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांची नावे पुढे येऊ लागली आहेत. परंतु खासदारकीचे तिकीट कोणाला मिळणार? यावरील निर्णयासाठी भाजप हायकमांडकडे प्रत्येकाच्या नजरा आहेत.
शिवाय 15 वर्षांहून अधिक काळ खासदारपदी असलेल्या सुरेश अंगडी यांच्या कुटुंबियांपैकी एकाला संधी देण्यात येते का? याबाबतीतही बेळगावमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
बेळगाव भाजपच्या वतीने सुरेश अंगडी यांच्या कुटुंबियातील एका सदस्याला भाजपाच्यावतीने संधी देण्यात येईल का? याबाबतीत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. सुरेश अंगडी यांच्या पत्नीला ही संधी देण्यात येईल की, त्यांची कन्या आणि मंत्री जगदीश शेट्टर यांची स्नुषा श्रद्धा अंगडी -शेट्टर यांना उमेदवारी देण्यात येईल? याबद्दल चर्चा – उपचर्चा सुरु झाल्या आहेत. परंतु भाजपाच्या कार्यप्रणालीनुसार घराणेशाहीला स्थान नसल्यामुळे इतर उमेदवारांना संधी देण्यात येईल का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
याव्यतिरिक्त खासदारकीच्या शर्यतीत सुरुवातीपासून इच्छुक असलेल्या उमेदवारांची पडताळणी करण्यात येण्याची शक्यता आहे. बेळगावमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे लिंगायत समाजामधून सर्वप्रथम खासदारपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांपैकी चर्चेत असणारे पहिले नाव हे सरकारचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांचे आहे. त्यानंतर मागील वेळेस उमेदवारी हुकलेल्या केएलई संस्थेच्या प्रभाकर कोरे यांचेही नाव सुचविले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हुक्केरी येथील माजी खासदार रमेश कत्ती, एम. बी. जिरली, राजेंद्र हरकुणी किंवा लिंगायत समाजातील विद्यमान आमदाराचे नावही पुढे येण्याची शक्यता राजकीय सुत्रांकडून वर्तविली जात आहे.
त्यांनतर लिंगायत समाजाव्यतिरिक्त मराठा समाजातील किरण जाधव यांचे नावही अग्रक्रमाने घेतले जात आहे. यासोबत जैन समाजातील माजी आमदार संजय पाटील, यांचीही नावे पर्याय म्हणून असू शकतील. इच्छुक उमेदवारांची यादी वाढतच जाणारी आहे. राजकीय स्पर्धेत अनेकांनी खासदारकीची स्वप्ने रंगवायला सुरु केली असून, या पोटनिवडणुकीत कोण नशीब आजमावणार आणि कोणाचे नशीब उजाडणार हे पाहणे आता कुतूहल ठरणार आहे. शिवाय अंगडींनंतर अशा एका उमेदवाराची बेळगावला गरज आहे, जो उमेदवार केवळ खासदारकीचे नशीब आजमिवणारा नसून बेळगावच्या विकासाला चालना देणारा असेल.