आर्थिक मंदी आणि त्यातच कहर म्हणून कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीमुळे प्रत्येकाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशातच प्रशासकीय कारभाराचा फटका आता तळागाळातील लोकांना बसत आहे. आज शनिवार खुट येथील भाजीविक्रेते आणि फेरीवाले रहदारी पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत.
या भाजीविक्रेत्यांचे विक्रीसाठी ठेवलेले साहित्य रहदारी पोलीस विभागाने रहदारीला अडथळा होण्याच्या कारणास्तव उचलून नेला. यावरून संतप्त भाजीविक्रेत्यानी विरोध दर्शवून निदर्शने केली.
गेल्या ५ महिन्यांपासून व्यापार मंदावला असून आमच्यासारख्या तळागाळातील व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. दोनवेळच्या जेवणाची भ्रांत आणि त्यातच मूलभूत गरजा भागविण्यासाठी सुरु असलेली धडपड.. आणि त्यात कहर म्हणून प्रशासनाचे नवनवे नियम यामुळे आम्ही जगायचे कसे? असा केविलवाणा प्रश्न भाजीविक्रेत्यांकडून उपस्थित केला जात होता.
प्रत्येक २ ते ५ वर्षात नव्या पोलीस आयुक्तांची बदली होते. प्रत्येक वेळी नव्या नियमावलीत सामोरे जाऊन आपला व्यवसाय सांभाळावा लागतो. अशातच कोरोनामुळे संपूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले असून मोलमजुरी करून जगत असता आमचे सामान उचलून नेण्यात आले आहे.
याचा आम्ही जाहीर निषेध नोंदवून यासंदर्भात आमदार अनिल बेनके याना भेटून न्याय मिळवू आणि तोडगा काढण्यासाठी विनंती करू असा पवित्र येथील भाजीविक्रेत्यानी घेतला होता.