गरिबांना तातडीने नुकसान भरपाई द्या मागील वर्षी महापुरात अनेकांची घरे कोसळली आहेत. मात्र त्यांना अजूनही नुकसानभरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणि भाडोत्री घरात राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने नुकसानभरपाई देऊन त्यांचे संसार थाटावेत यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून तहसीलदार आर के कुलकर्णी यांनी तातडीने प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी केल्या.
नुकतीच तहसीलदार कार्यालयात त्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन या सूचना केल्या आहेत. त्यांच्याबरोबर इतर जण उपस्थित होते. याचबरोबर वृद्ध व विधवा पेन्शन देण्यात आली नाही. त्यामुळे मोठी समस्या झाली आहे.
कोरोना महामारीत या समस्या सोडवण्याची गरज होती. मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली असून तातडीने यासाठी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत गांभीर्याने घेतले नाही तर लवकरच आंदोलन छेडू असा इशाराही जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी दिला आहे.
बेळगाव तालुक्या बरोबरच आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी तहसीलदार यांची भेट घेतली. नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी आम्हाला निवडून देण्यात आले आहेत. मात्र अधिकारीवर्ग याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी वर्गाने तातडीने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे असेही गोरल यांनी सांगितले.