बेळगाव शहरातील नामांकित अशा कल्याण ज्वेलर्स मधील चोरीच्या प्रकाराने खळबळ माजली आहे. ग्राहक असल्याचे भासवून एका भामट्याने खडे बाजारातील कल्याण ज्वेलर्स मधून पाच तोळ्याचे चेन लांबवण्याची घटना उशिरा उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे.
यासंबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे उघडकीस आले असून सीसीटीव्ही फुटेज वरून हा प्रकार कळला आहे. रविवारी सायंकाळी 35 ते 40 वयोगटातील एक भामटा कल्याण ज्वेलर्स मध्ये आला या भामट्याने चेन दाखविण्यास सांगितले.
चेन दाखविताना त्याने कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याचे पाहून ट्रे समोर ठेवण्यात आलेल्या 47.52 ग्रॅम वजनाची चेन स्वतःच्या गळ्यात घातली आणि आपल्या गळ्यातील डुप्लिकेट त्या ट्रेमध्ये ठेवून तो पसार झाला. त्यानंतर हा सारा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आला. ट्रेमध्ये बनावट चेन कुठून आली यासाठी सीसीटीव्ही फुटेज करण्यात आले. यावरून या भामट्याने आपला डाव साधल्याचे समजले. यासंबंधी कल्याण ज्वेलर्सचे संस्थापक सोनू पी एस यांनी फिर्याद दिली आहे.
गेल्या रविवारी ही घटना घडली असून यासंबंधी खडे बजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने सराफी पेढ्या मध्ये एकच खळबळ माजली असून असे प्रकार घडू नयेत यासाठी आता योग्य ती खबरदारी घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.