शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी कामांतर्गत शहराच्या विकासाला ग्रहण लागल्याची चिन्हे दिसून येत आहे. दररोज पुढे येणाऱ्या तक्रारींमध्येही आता वाढ होऊ लागली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराला विद्रुप करण्याचे काम होत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.
एका बाजूला झाडे वाचवा, झाडे जगवा असा संदेश देण्यात येतो. यासाठी अनेक प्रशासकीय उपक्रम हाती घेण्यात येतात. अनेक ठिकाणी वृक्षलागवड केली जाते.
राजकारणी, नेतेमंडळी व्यासपीठावरून निसर्गाबद्दल अनेक भाषणे देतात. परंतु शहरातील आदर्श नगर आणि भाग्यनगर परिसरात झाडांची कत्तल करण्यात येत आहे. यामुळे निसर्गाला हानी पोहोचत नाही का? असा सवाल आता येथील नागरिक उपस्थित करत आहेत.
आदर्शनगर आणि भाग्यनगर याठिकाणी शहरातील झाडे तोडण्याचा “हॉट स्पॉट” बनला आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मोठमोठे वृक्ष “डेंजर झोन”च्या नावाखाली तोडण्यात येत आहेत.
भरदिवसा केवळ बाहेर आलेल्या फांद्या छाटण्याचे काम नजरेस पडते तर दुसरे दिवशी त्याठिकाणच्या वृक्ष गायब होतो! असा प्रकार याठिकाणी सुरु आहे. या सर्व गोष्टी पाहता स्मार्ट सिटी कामकाज नेमके कोणत्या दिशेने जात आहे? याबाबत मात्र नागरिक आता अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.
यासंदर्भात वनखात्याने नुकतेच एक स्पष्टीकरण दिले आहे. आदर्शनगर आणि भाग्यनगर येथे करण्यात येणारी वृक्षतोड ही जुन्या वृक्षांची असून या वृक्षांच्या खोलवर रुतलेल्या मुळांमुळे आजूबाजूच्या परिसरातील इमारतींना धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने याची खात्री करून घेतल्यानंतर या वृक्षतोडीसाठी परवानगी दिली असल्याचा खुलासा वनविभागाने केला आहे.