Friday, January 3, 2025

/

अनगोळ मार्गावर स्मार्ट सिटीचे तीन तेरा!

 belgaum

नेहमीच वर्दळीचा असणारा अनगोळ रोड स्मार्ट सिटी कामकाजाच्या विळख्यात अडकला असून तांत्रिकदृष्ट्या निष्फळ असणाऱ्या कामकाजाचा अवलंब येथे करण्यात येत आहे. यामुळे प्रत्येक आठवड्यात नवनवीन अडचणी नागरिक सहन करत असून प्रत्येकवेळी स्मार्ट सिटी कंत्राटदारांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सध्या येथे विजेच्या पाइपलाइनचे कामकाज सुरु असून यासाठी जवळपास ४ फूट खोल आणि १० फूट लांब अशा खड्ड्यांची खोदाई करण्यात आली आहे. त्यातच पावसाळ्याचा मौसम असून या खड्डयातून पाणी साचत आहे. आणि याचा अंदाज येथून वर्दळ करणाऱ्या नागरिकांना न आल्यामुळे मागील २ दिवसात १५ लोक या खड्ड्यात पडले असल्याची माहिती निदर्शनास आली आहे. त्यासोबतच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ड्रेनेज लाइनसाठीही खोदाई करण्यात आली आहे.

त्यामुळे दोन्ही बाजूला असलेल्या खोदकामामुळे नागरिकांची पुरती तारांबळ उडत आहे. याशिवाय या खड्ड्यांलगत कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक किंवा सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. शिवाय या पाईपलाईन सिमेंटच्या घालणे जरुरीचे असून प्लास्टिक पाइपचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या रस्त्यावरील वर्दळ पाहता आणि भविष्यात रास्ता बांधकाम होणार असल्याने या पाइपलाइनला तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हेही काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघडकीस आले आहे.

Dangerous smart city works
Dangerous smart city works

स्मार्ट सिटी अंतर्गत कामात रस्त्यांच्या कामालाही सुरुवात करण्यात आली असून नव्याने रास्ता बांधकाम करण्यासाठी रस्त्यांवरही जेसीबी फिरवून रस्ता ओबड-धोबड करण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांना अतिशय त्रास सहन करावा लागत असून अनेक वाहने या उखडलेल्या रस्त्यावर पलटी होण्याचे प्रकारही वाढले आहेत. या रस्त्यावरून अनेक ऑटोरिक्षांची वर्दळ असून गेल्या महिन्यात एक ऑटोरिक्षाही पलटी झाली होती. परंतु सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत ज्या-ज्या ठिकाणी कामकाज हाती घेण्यात आले आहे, त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कंत्राटदाराविरोधात तक्रारी नोंदविण्यात येत आहेत. या कामकाजासाठी नेमण्यात आलेले कंत्राटदार हे ज्युनिअर लेव्हल वरील असल्याचे वृत्त सूत्रांकडून मिळाले आहे.

त्यामुळे हे कामकाज तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. येथील स्थानिकांसहित व्यापारीवर्गालाही या स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या कामकाजाचा फटका बसत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. अन्यथा स्मार्ट सिटी भकास होण्यास वेळ लागणार नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.