राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून अनेक तरुण यात वहावत जात आहेत. यावर रोख लावण्यासाठी सरकारने पाऊले उचलावीत, यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
कर्नाटक राज्यात अनेक सांस्कृतिक चळवळी होत असतात. परंतु गेल्या वर्षभरात अंमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणे पुढे येत असून राज्याच्या प्रतिष्ठेसाठी हे धोकादायक आहे. याशिवाय अनेक तरुण याच्या आहारी जात असून तरुणाईचे भवितव्य अंधारात जात आहे. अंमली पदार्थांची तस्करी करण्यात जे माफिया आहेत त्या माफियांविरोधात सरकारने ठोस पाऊले उचलून सक्त शासन करण्याची गरज आहे. यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने संपूर्ण सहकार्य दिले जाईल.
अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कायदा अमलात आणावा, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात यावा, पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या भागामध्ये जबाबदारीने संबंधित पोलीस ठाण्याने कारवाई करावी, पब, क्लब, लाईव्ह बँड, हॉटेल्स आदी ठिकाणी नियमित तपासणी करावी, यामागे कोणत्याही बड्या राजकारण्यांच्या हात असल्यास त्यांच्यावर कोणताही मुलाहिजा न ठेवता कारवाई करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
देशभरात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री वाढत चालली असून यावर त्वरित तोडगा काढून, यामध्ये सहभाग असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन सादर करताना श्रीराम सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विनय अँग्रोळ्ळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.