बेळगाव शहरात वाहतुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. मध्यवर्ती ठिकाण आणि मुख्य बाजारपेठेत शहराचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. परगावाहून येणाऱ्या नागरिकांचीही वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहर आणि परिसरात पार्किंगची समस्या वाढली आहे.
यादरम्यान ही वाहतुकीची आणि पार्किंगची समस्या लक्षात घेत प्रशासनाने रस्ते रुंदीकरणाचा घाट घातला. 2015 साली या रुंदीकरणाला सुरुवात झाली आणि त्याचे कामही पूर्ण झाले. मात्र हे रुंदीकरण नेमके कोणासाठी करण्यात आले आहे? असा सवाल आता नागरीकातून उपस्थित करण्यात येत आहे.
शहरात ज्या ज्या ठिकाणी रुंदीकरण करण्यात आले, त्या त्या ठिकाणी अनेकांच्या मालमत्तांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकाच वेळी हाती घेण्यात आलेल्या या रुंदीकरणाच्या कामामुळे व्यावसायिकांचेही नुकसान झाले. “सरकारी काम आणि सहा महिने थांब!” अशाप्रकारे नेहमीच उपहासात्मक बोलल्या जाणाऱ्या सरकारी कामांविषयी या उक्तीप्रमाणेच ही कामे रेंगाळली.. आणि रेंगाळलेली कामे पूर्ण होईपर्यंत व्यावसायिकांच्या व्यवहाराची पुरतीच तारांबळ उडाली.
दरम्यान रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांना वाहनतळाचे म्हणजेच पार्किंग झोनचे स्वरूप प्राप्त झाले. आणि दुकाने – आस्थापनांच्या समोर चारचाकी वाहने बिनधास्तपणे पार्किंग केली जाऊ लागली.
बेळगाव शहरातील रामलिंग खिंड गल्ली येथे दुतर्फा वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले असून पादचाऱ्यांना चालण्यासाठी देखील त्रास होत आहे. त्यामुळे रामलिंग खिंड गल्ली परिसरात आणि ज्या ज्या ठिकाणी रुंदीकरण करण्यात आले आहे, त्या ठिकाणी केवळ पार्किंग करण्यासाठी हे रुंदीकरण झाले असावे का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे याकडे रहदारी विभाग आणि महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन रस्ता खुला करण्याची मागणी होत आहे.
बेळगाव शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना पार्किंगची समस्याही मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे. ज्या ठिकाणी तळमजला आस्थापने आहेत. त्या ठिकाणी पार्किंग होत नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. मध्यंतरी महानगरपालिकेने मोहीम हाती घेतली होती. मात्र कालांतराने ती स्थगित झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण कोणासाठी होत आहे असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
शिवाय लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांना गेल्या ५ ते ६ महिन्यात मोठा फटका बसला आहे. त्यातच सध्या व्यवसायही मंदावले आहेत. अशावेळी एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता प्रत्येक व्यावसायिक “साईड इन्कम”चा अवलंब करत आहेत. अशावेळी पार्किंग करण्यात येणाऱ्या वाहनांची अडचण आता येथील व्यावसायिकांना होत असून यादरम्यान दुकानदार आणि वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रकारही घडत आहेत. काही ठिकाणी वादावादीमध्ये पोलिसांनाही पाचारण करण्याची वेळ येत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने विचार करून पार्किंग करण्यात आलेली वाहने हटवावीत, आणि पार्किंसाठी इतरत्र सोया करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.