सध्या लॉकडाऊन सर्वत्र शिथिल करण्यात येत असून छोट्या प्रमाणात सण-उत्सव साजरे करण्यास प्रशासनाने अनुमती दिली आहे.
यामुळे बँडवादकांनाही आता परवानगी देण्यात यावी, यासाठी आज बेळगाव जिल्हा मंगलवाद्य कलाकार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर अनेक समारंभ, उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले. पर्यायाने सण-उत्सव-समारंभामध्ये शोभा वाढविण्यात येणाऱ्या कलाकारांचे कामकाजही ठप्प झाले.
आणि यामुळे या कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले. अनेक शुभकार्याना वाजविण्यात येणाऱ्या बँडकलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. चरितार्थाचे साधनच बँड असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या कलाकारांना परवानगी द्यावी, अशी मागणी आज या संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दलित समाजाच्या मागण्यांचा विचार व्हावा : दलित संघटनेची मागणी
गेल्या कित्येक वर्षांपासून होत असलेल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या विधिमंडळ अधिवेशनात चर्चा करण्यात यावी, अशी मागणी दलित संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात सदाशिव आयोगावर चर्चा व्हावी आणि दलित बांधवांच्या हक्काची कार्यवाही करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी दलित संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
आज जिल्हाधिकाऱ्यांना अशा मागणीचे निवेसं सादर करण्यात आले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन येत्या महिन्यात म्हणजेच दिनांक 21 पासून सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये दलित संघटनांच्या कित्येक वर्षापासून असलेल्या मागणीचा विचार व्हावा, याचप्रमाणे सदाशिव आयोगाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .