सीमाभागात अनेक ठिकाणी साहित्य संमेलने भरविण्यात येतात. मराठी साहित्य संमेलन भरविण्यासाठी कर्नाटक सरकार नेहमीच आडमुठे धोरण वापरते. त्यानंतर संमेलन झाल्यानंतर आयोजकांना विविध आरोपांखाली नोटीस पाठविण्यात येते, यात नवे असे काहीच नाही. सध्या कुद्रेमानी येथे भरविण्यात आलेल्या साहित्य संमेलन आयोजकांना उप पोलीस आयुक्तांच्या कचेरीतून नोटीस बजावण्यात आली आहे.
मराठीचा नेहमीच पोटशूळ असणाऱ्या कर्नाटक सरकारच्यावतीने सातत्याने मराठी भाषिकांवर तिरकस नजर ठेवण्यात येते. शहराच्या उप पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) कार्यालयातून आणि विशेष कार्यनिर्वाहक दंडाधिकारी, बेळगाव शहर विभागाच्यावतीने कुद्रेमानी साहित्य संमेलनाच्या नागेश निंगाप्पा राजगोळकर, मोहन केशव शिंदे, शिवाजी महादेव गुरव, काशिनाथ गुरव, मारुती गुरव, गणपती बडसकर यांच्या नावे ककती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करून नोटीस बजाविण्यात आली आहे.
पी.ए.आर. क्रमांक ०१/२०२०, दिनांक ११.०१.२०२०, कलम १०७ सीआरपीसी अंतर्गत आरोपाखाली सीमावाद आणि भाषावाद याबद्दल साहित्यसंमेलनात सार्वजनिकरित्या प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील काळात अशाप्रकारे पुन्हा समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आयोजकांविरोधात सीआरपीसी कायदा १९७३ कलम १०७ अंतर्गत ५०,००० हजार रोख, दोन जामीनदारांसह पुढील सहा महिने हजेरी द्यावी असे नोटिशीत म्हटले आहे.
तत्कालीन पोलीस उपायुक्त आयपीएस अधिकारी सीमा लाटकर (कायदा आणि सुव्यवस्था) आणि विशेष कार्यनिर्वाहक दंडाधिकारी, बेळगाव शहर यांच्यावतीने ही नोटीस जारी करण्यात आली असून मंगळवार दिनांक २२ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ४.०० वाजता दोघांच्या जमीनासह स्वयंघोषित बॉण्ड घेऊन न्यायालयात हजार राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.