आज खासबाग येथे पोलिसांनी भाजी विक्रेत्यांना बळजबरीने हटवून भाजीविक्री करण्यास मनाई केली. सकाळी पोलिसांनी अचानकपणे ही कारवाई केल्याने येथील भाजीविक्रेते संतप्त झाले होते.
शहरात अनेक ठिकाणी भाजीविक्रेत्यांची संख्या वाढली आहे. लॉकडाऊन नंतर सहसा भाजीविक्री आणि किराणा दुकानाला अनेकांनी पसंती दिली आहे. परंतु रस्त्या-रस्त्यावर भाजी विक्री सुरु असून केवळ खासबाग येथे भाजीविक्री करण्यास पोलिसांनी मनाई केली. आणि त्यानंतर येथील भाजीविक्रेत्यानी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
लॉकडाऊनच्या काळापासून म्हणजे जवळपास ६ महिने घरीच बसून असलेल्या अनेकांनी आता आपला व्यवसाय सुरु केला आहे. अनेक ठिकाणाहून कर्ज काढून रोजंदारी करणाऱ्या विक्रेत्यांना आता पोलिसांचा जाच सहन करावा लागत आहे. मागील पंधरवड्यात शहरात अनेक ठिकणी रहदारी पोलिसांनी वाहतूक कोंडीच्या कारणास्तव अनेक भाजीविक्रेते, रस्त्याशेजारी बसणारे किरकोळ व्यावसायिक याना त्यांच्या जागेवरून हटविले होते. मात्र आमदार अनिल बेनके यांच्याशी संपर्क साधून नियमानुसार व्यवसाय करण्यास परवानगी मिळविली होती. त्यानंतर आज खासबाग परिसरातील बसवेश्वर सर्कल येथे असणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी अचानकपणे हटविण्यात आल्याने भाजी विक्रेत्यांनी आक्रोश व्यक्त केला.
शहरातील अनेक रस्त्यांवर भाजी विक्री करण्यात येते. मध्यवर्ती परिसरात कोणत्याही नियमांचे पालन न करता भाजी विक्री करण्यात येते. मग केवळ खासबागमध्येच कारवाई का करण्यात आली? असा प्रश्न येथील भाजीविक्रेत्यानी उपस्थित केला. महागाई, आर्थिक मंदी आणि त्यानंतर कोरोनामुळे बंद असलेले व्यवसाय यामुळे आर्थिक घडी विस्कटून गेली आहे. उदरनिर्वाह कसा करावा हा गंभीर प्रश्न आमच्यासमोर आवासून उभा आहे. कर्जावर घेतलेली रक्कम परतफेड कशी करावी? आणि घर कसे चालवावे? अशी विवंचना आम्हाला सतावते आहे, अशी प्रतिक्रिया येथील भाजीविक्रेत्यानी व्यक्त केली.
आज अचानकपणे करण्यात आलेल्या कारवाईमुळे आपल्यावर संकट ओढवले असून आम्ही आणखी अडचणीत सापडू. या भीतीमुळे येथील भाजी विक्रेत्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे.