नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) च्या वतीने कर्नाटकात राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यानुसार बेळगाव ते खानापूरच्या रस्त्याचेही कामकाज हाती घेण्यात आले होते. या रस्त्याचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे.
सध्या १४ महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प कर्नाटकात हाती घेण्यात आले आहेत.यामध्ये एकूण १,२०९ किलोमीटर रस्त्यांचा समावेश असून अंदाजे १७,२६३ कोटी रुपये खर्चातून या रस्त्यांचे कामकाज होत आहे. या सर्व रस्त्यांचे कामकाज अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहे.
या १४ महामार्ग प्रकल्पातील ६ प्रकल्प अजून विलंबित असून जमीन संपादन करणे, वनविभागाकडून मंजुरी मिळविणे यासाठी रखडले आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
खानापूरपर्यंतचा रस्ता चौपदरी करण्यात येत असून त्यानंतर गोवा सीमेपर्यंत हा रास्ता दुपदरी असेल. पुढील टप्प्यात हा रस्ता अनुक्रमे चौपदरी आणि सहापदरी करण्यात येणार आहे.