बेळगाव शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांच्या तक्रारी दिवसेंदिवस विविध भागातून ऐकायला मिळत आहेत. रस्ते, गटारी खोदकाम, वीज खांब, ड्रेनेज आणि अशा अनेक सुविधांसाठी स्मार्ट पणे करण्यात येणाऱ्या कामांबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
चन्नम्मा नगर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचे कामकाज हाती घेण्यात आले असून याठिकाणी पेव्हर्स बसविण्यात येणार आहेत. परंतु हे पेव्हर्स एका दवाखान्यासमोर उतरवून ढीग लावून ठेवण्यात आला आहे, त्यामुळे सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राणी चन्नम्मा नगर येथे एका दवाखान्यासमोर उतरविण्यात आलेले हे पेव्हर्स एकाच ठिकाणी ढीग करून रचण्यात आले आहेत. कोविड मुळे अनेक दवाखाने बंद आहेत. सर्वसामान्य आजारांवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. अशातच काही डॉक्टर्स पुढाकार घेऊन सर्वसामान्य आजारांवर उपचार करण्यासाठी सरसावले आहेत. परंतु आजूबाजूच्या परिसराचे भान न ठेवता हे पेव्हर्स एकाच ठिकाणी रचण्यात आले आहेत. यामुळे दवाखान्यात जाण्याचा मार्गच बंद झाला आहे.
यासंदर्भात समाजसेवक आप्पासाहेब गुरव यांनी संबंधित स्मार्ट सिटी कंत्राटदाराला याबाबतीत माहिती दिली. शहराचा विकास हा महत्वाचा आहेच. परंतु योग्य मार्गाने आणि योग्य रीतीने हा विकास करण्यात आला तर कोणाचीही हरकत नसेल. परंतु या कामकाजांमुळे विकास बाजूला राहून स्मार्ट सिटी कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
स्मार्ट सिटीच्या कामगारांना योग्य मार्गदर्शन मिळाले नसून या योजनेत हाती घेण्यात आलेल्या कामांच्या तक्रारींची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे अर्ध्यावर सोडण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी या कामांना ताळ ना तंत्र अशापद्धतीने करण्यात येत आहे.
संबंधित स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांशी हे पेव्हर्स हटविण्याबाबत चर्चा करण्यात आल्यानंतर हे पेव्हर्स त्या ठिकाणाहून हटविण्यात आले आहे. बेळगाव शहरात अनेक ठिकाणी होत असलेली स्मार्ट सिटीची कामे ही योग्य नियोजनाद्वारे करण्यात येत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असून स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी याबाबतीत गांभीर्याने लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
Appasaheb,
Well done. Keep it up.
?????