शहरातील अनेक ठिकाणी भरदिवसा, विनाकारण पथदीप सुरु असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर नेहमीच झळकतात. पण ज्यावेळी, ज्याठिकाणी याची खरोखर गरज असते त्याठिकाणी मात्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले आढळून येते. बेळगाव स्मार्ट सिटीमधील अनागोंदी प्रकार सुरु असतानाच आता मनपा व हेस्कॉमच्या बाबतीतही अनेक तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.
शहरातील नाथ पै चौक, शहापूर ते बसवेश्वर चौक, खासबाग डबल रोड येथील स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबतीत संबंधित महानगरपालिका व हेस्कॉम विभागाला कळवून १५ दिवस झाले आहेत. परंतु तरीही याबाबत कोणतीही दाखल अजूनपर्यंत घेण्यात आली नाही.
या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अंधारामुळे त्रास सहन करावा लागत असून या भागात भुरटे चोर आणि मद्यपींची संख्या वाढली आहे. सायंकाळ्च्या वेळेस महिलावर्ग येथून ये-जा करत असतो.
त्यामुळे मद्यपींचा त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने तातडीने या समस्येवर तोडगा काढून या स्ट्रीट लाईटचे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.