शहर-परिसरासह तालुक्यातील भागात आधीच भटक्या कुत्र्यांचा हैदोस सूरु आहे. अशातच केंबाळी नाल्यात हिंडलगा येथील मटण-चिकन दुकानातील कचरा टाकण्यात येत आहे.
सुळग्याच्या हद्दीत व फॉरेस्ट नाक्याजवळ असलेल्या केंबाळी नाल्यात हा कचरा टाकताना मटण चिकन दुकानातील कर्मचारी निदर्शनास आले आहेत.
याठिकाणी अंधार असून भटक्या कुत्र्यांचा वावर हमखास असतो. अशातच मटण- चिकनचा कचरा टाकण्यात येत असल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांवर ही भटकी कुत्री अंगावर धावून जात आहेत. ही बाब धोकादायक असून येथे अपघात होण्याचीही दाट शक्यता आहे.
जनावरांना अशा खाद्याची सवय लागली तर ही जनावरे हिंसक बनत जातात. त्यामुळे या रस्त्यावरून वर्दळ करणाऱ्या नागरिकांना याचा धोका आहे.
संबंधित लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाने याबाबतीत लक्ष घालून हा प्रकार वेळीच थांबवावा, तसेच मटण-चिकन दुकानदारांना याविषयी सक्त ताकीद देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.