बेळगाव शहर आणि परिसरात तसेच जिल्ह्यात अन्नभाग्य तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्यांचे मुंबई कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे.
बेळगाव जिल्ह्यात सापडलेला तांदूळ हा मुंबईला नेत असल्याचे कबुली संबंधितांनी दिल्याने एकच खळबळ माजली आहे. कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये या उद्देशाने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अन्नभाग्य ही योजना सुरू केली होती. एक रुपये प्रति किलो दराने तांदूळ गरिबांना देण्यात येत होते.
मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे उघडकीस आले आहे. हुबळी येथील काळाबाजार करणारे राजरोसपणे हे तांदूळ विकत आहेत. साठेबाजी करून संबंधित तांदूळ मुंबईला पाठवण्यात येत आहे. बेळगाव पोलिसांनी गेल्या आठ दिवसात दोन कारवाया केल्या आहेत.
50 किलोच्या सुमारे बाराशे हून अधिक पोती जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईने एकच खळबळ माजली असून काळाबाजार करणारे भयभीत झाले आहेत. अजूनही हुबळी येथे राजरोसपणे अन्न भाग्य तांदळाचा काळाबाजार व साठेबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तोच तांदूळ बेळगाव जिल्ह्यातून मुंबईला पाठवण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे बेळगाव व हुबळी येथील तांदूळ मुंबई येथील बाजारपेठेत विक्री करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निबरगी यांनी दिलेल्या माहितीवरून अन्नभाग्य योजनेतील वाटप करण्यात आलेला तांदळाचा काळाबाजार करून तो मुंबईला पाठवण्यात येत असल्याचे तपासात उघडकीस आले असून अनेक गोरगरिबांच्या वाटणीचा हिस्सा हे काळाबाजार करणारे गायब करत आहेत.
त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याआधीही या योजनेत मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आले होते. मात्र आता काळाबाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अन्न भाग्य योजनेतील तांदळाचा काळाबाजार सुरूच आहे. तो रोखण्यासाठी पोलिस आता सज्ज झाले असून यापुढे असे प्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.