मंडोळी रोड, टिळकवाडी येथील मुन हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर योग्य उपचार केले जात नाहीत. रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार या रुग्णालयात सुरु असून उपचाराच्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळला जात असल्याचा आरोप एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. शिवाय रुग्णाच्या मृत्यूला या रुग्णालयाला दोषी ठरविण्यात आले असून रुग्णालय प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंडोळी रोड टिळकवाडी येथील मुन हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येतात. या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या यल्लाप्पा जाधव नामक व्यक्तीचा २० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. या रुग्णावर योग्य उपचार करण्यात आले नाहीत शिवाय अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे.
या रुग्णावर उपचार करण्यासाठी रुग्णालयाने भरमसाठ पैसे उकळले आहेत शिवाय ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या नावावर अतिरिक्त शुल्क आकारल्याचा आरोप मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयाच्या विरोधात आज मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच मृताच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी निवेदन सादर केले.
या रुग्णालयात ज्या पद्धतीने शुल्क आकारले जातात त्याच्या तुलनेत उपचार दिले जात नाहीत. रुग्णांची योग्यरितीने देखभाल केली जात नाही. डॉक्टरांचे दुर्लक्ष होते. आणि अशा अनेक रुग्णांना आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे.
यामुळे यल्लाप्पा जाधव यांच्या कुटुंबियांसह इतर रुग्णांच्या कुटुंबीयांनीही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आणि या रुग्णालयाविरोधात टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.