मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या भाजीविक्रेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी यासंबंधी रहदारी पोलीस विभाग आणि प्रशासनाशी चर्चा करण्याचे ठरविले. यानंतर आज रविवार दि. २० सप्टेंबर रोजी येथील भाजीविक्रेत्यांना बाजारपेठेत महानगरपालिकेच्या वतीने मार्किंग करुन देण्यात आले आहे. या मार्किंगच्या आत भाजी विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
गेली ३० ते ३५ वर्षे खासबाग परिसरात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत बागेवाडी, हिरेबागेवाडी, आलारवाड, बस्सापूर, येळ्ळूर, धामणे अशा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाजीविक्रीसाठी शेतकरी तसेच इतर भाजीविक्रेते दाखल होतात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत भाजीपाल्याची विक्री करून ते परततात.
मध्यन्तरी लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले. आणि त्या अनुषंगाने या व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसला. त्यानंतर आता काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी पुन्हा व्यवसायाला सुरवात करण्यात आली. अजूनही म्हणावे तसे व्यवसाय तेजीत आले नसून अचानकपणे रहदारी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे येथील भाजीविक्रेत्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी एएसआय उदय पाटील आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर वाहतुकीला अडथळा होणार नाही अशाप्रकारे नियम आणि सूचना ठरवून भाजी विक्रेत्यांना रस्त्याशेजारी मार्किंग करून देण्यात आले. या मार्किंगच्या आत विक्रेत्यांना व्यवसायास परवानगी दिली आहे. भाजी विक्रेत्यांनी नियम पळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
मागील आठवड्यात झालेल्या या प्रकारानंतर भाजी विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आपल्या छोट्या छोट्या व्यवसायासाठी कर्जाऊ रक्कम घेऊन व्यवसाय करणाऱ्या या विक्रेत्यांना मागील रविवारी करण्यात आलेल्या कारवाईनंतर समस्या निर्माण झाली होती. परंतु लोकप्रतिनिधी आणि पोलीस, तसेच महानगरपालिकेच्या मध्यस्थीमुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे, त्यामुळे भाजीविक्रेत्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.