कर्नाटकातील बंगळूर नंतर सर्वात जास्त आयकर भरणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बेळगावचा समावेश आहे. याव्यतिरिक्त बेळगाव हि कर्नाटकाची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून ओळखण्यात येते. परंतु गेल्या काही दिवसांपासून बेळगावमधील काही महत्वाची प्रशासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात येत असून आता आयकर कार्यालयही हुबळी येथे स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बेळगावमध्ये असलेल्या आयकर विभाग कार्यालयात प्रधान आयुक्त कार्यालय कार्यान्वित होते. यासोबतच २ श्रेणी सहआयुक्त, २ सहाय्य्क आयुक्त, उत्तर कर्नाटक आणि गोवा येथील आयकर विभागाच्या व्याप्तीतील अन्वेषण विभागाव्यतिरिक्त ६ अधिकारी हे स्वतःच्या सहआयुक्त व सहाय्यक आयुक्तांसह कार्यरत होते. परंतु आता २ आयुक्त आणि १० श्रेणी अधिकाऱ्यांची हुबळी येथे नियुक्ती केली जाणार आहे.
कर्नाटकातील अधिक कर भरणाऱ्या शहरांपैकी दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या बेळगाव शहराला व्यापार, उद्योगाचा समृद्ध वारसा लाभला आहे. शिवाय आयकर विभागाच्या कार्यालयासाठी सरकारने ४.५ एकर जागेची तरतूदही केली आहे. परंतु अचानकपने हा स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेळगाव शहरातील आयकर कार्यालय इतरत्र स्थलांतरित करताना बेळगावला अधिकाधिक प्राप्तिकर अधिकाऱ्यांची नियुक्ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. याशिवाय बेळगावमधील आयकर प्रशासनासाठी एक स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात येत आहे.