खानापूर तालुक्यातील हलशी येथील कदंबकालीन मंदिराशेजारी अतिक्रमणे होत आहेत. शिवाय महादेव मंदिराशेजारी प्लॉट विक्री सूर आहे. यामुळे पुरातन मंदिरांना धोका निर्माण झाला असून यावर त्वरित तोडगा काढावा, यासाठी मराठी साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी याना निवेदन सादर केले. यावेळी सुरेश अंगडी यांनी पुरातन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बडिगेर यांच्याशी संपर्क साधून हलशीला भेट देण्याची सूचना केली आहे.
हलशी गाव हे केंद्र सरकारने पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केले आहे. येथील शेकडो पुरातन मंदिरे पुरातत्व विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत. येथील मंदिरांची डागडुजी केंद्राकडून सुरु आहे. शिवाय कादंबकालीन मंदिराच्या ३०० मीटर अंतरापर्यंत घरे बांधणी करण्यास किंवा खोदाई करण्यास मनाई आहे. परंतु हलशी गावच्या पूर्वेला सीमोल्लंघनाच्या ठिकाणी महादेव मंदिरालगत दोन फुटांवर प्लॉट विक्री केली जात आहे.
येथील महादेव मंदिर जमिनीच्या आत ४० फूट खोल दाबले गेले आहे. येत्या काही दिवसात याठिकाणी उत्खनन करण्यात येणार आहे. तरीही प्लॉट विक्री सुरु आहे. येथील कदंब कालीन मूर्तीना व मंदिरांना धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेऊन केंद्रामार्फत पुरातन विभागाला सूचना करून गावातील मंदिरांना संरक्षण द्यावे, आणि पुरातत्व विभागाकडून त्वरित उत्खननाची कारवाई हाती घेण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन सादर करताना कदम मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष उमेश देसाई, उपाध्यक्ष काका देसाई, कार्यदर्शी वामनराव कदम, भाजप उपाध्यक्ष प्रमोद कचेरी, भाजप नेते संजय कुबल, ग्रा. पं. सदस्य यशवंत पाटील आदी उपस्थित होते.