कर्नाटकातील पहिली किसान रेल १९ सप्टेंबर ते १७ रोजी बंगळूर, निजामुद्दीन आणि दिल्लीदरम्यान धावणार आहे. 2,७५१ किलोमीटरचा प्रवास करणारी रेल्वे मैसूर, हुबळी, पुणे या मार्गे धावणार आहे. या रेल्वेमुळे शेतकऱ्यांना कमी दरात शेतमालाची वाहतूक करता येईल, असे मत दक्षिण पश्चिम रेल्वेने व्यक्त केले आहे.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वेची घोषणा केली होती. किसान रेल्वे ही स्पेशल पार्सल ट्रेन असेल, ज्यामध्ये धान्य, फळ आणि भाजीपाला पाठवण्याची व्यवस्था असेल. नाशवंत वस्तूंसाठी राष्ट्रीय शीत पुरवठा साखळी, दूध, मांस आणि मासे यांचा समावेश आहे.
किसान रेल्वेमुळे कृषी उत्पादने जलद वाहतुकीद्वारे देशभरात पोहचविल्या जातात. यामुळे शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होत आहे. छोटे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या गरजा भागविणाऱ्या या गाडीला चालना देण्यासाठी मध्य रेल्वे ही बिझनेस डेव्हलपमेंट युनिटच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी, लोडर्स, एपीएमसी आणि व्यक्तींशी मार्केटिंगच्या बैठका घेऊन त्यांच्या मागण्या एकत्रित करत आहे. त्यामुळे प्रतिसाद वाढत आहे.
दक्षिण पश्चिम रेल्वेने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार रेल्वे क्रमांक ००६२५ ही रेल्वे १९ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत प्रवास करणार असून केएसआर बंगळूर येथून शनिवारी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजता सुटणार आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी ११.४५ वाजता निजामुद्दीन स्थानकावर पोहोचणार आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक ००६२६ निजामुद्दीन येथून मंगळवारी सायंकाळी ५.०० वाजता सुटून पुन्हा बंगळूर स्थानकावर शुक्रवारी १.४५ वाजता पोहोचणार आहे.
या प्रवासादरम्यान ही रेल्वे मैसूर, हासन, अरसिकेरे, दावणगेरे, हुबळी, लोंढा, बेळगाव, मिरज, पुणे, मनमाड, भुसावळ, भोपाळ, झांशी, आग्रा कॅंटोन्मेंट आणि मथुरा या रेल्वेस्थानकावर थांबणार आहे.
या रेल्वेमध्ये आपला माल नियोजित मार्गावरील स्थानकावर लोड/अनलोड करण्यास दिलेल्या वेळेतच लोड करण्याची परवानगी दिली आहे. परंतु या रेल्वेमध्ये प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे रेल्वे विभागाने जाहीर केलेल्या माहितीपत्रकात नमूद केले आहे.