तीस वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या बेळगाव – कित्तूर – धारवाड या नियोजित रेल्वेमार्गाला आता तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. एकूण ९२७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम आता मार्गी लागणार आहे. या रेल्वेमार्गाच्या कामकाजाचा कार्याला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अगदी यांनी दिली.
या प्रकल्पाच्या कार्यक्रमासाठी राज्य व केंद्र सरकारकडून सम प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार असून या रेल्वे मार्गावर ११ रेल्वे स्थानके, १४० लहान – मोठे पूल, १५ ओव्हर ब्रिज बांधण्यात येणार आहेत. सदर रेल्वे मार्गामुळे बेळगावहून हुबळीकडे रेल्वे मार्गाने जाण्यासाठी सध्या किमान ३ तासांचा अवधी लागतो. परंतु या रेल्वे मार्गामुळे आता कमी वेळ लागणार आहे.
अनेकवेळा या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्या सर्वेक्षणानुसार ७३ कि.मी. लांबीच्या या रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी सुमारे ९९८ कोटी रुपायांचा खर्च अपेक्षित होता. ७३ किमी. लांबीच्या रेल्वे प्रकल्प सर्वेक्षणाचे काम व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून या नवीन रेल्वे मार्गावर बेळगावसह देसूर, के. के. कोपा, बागेवाडी, एम. के. हुबळी, हुळीकट्टी, कित्तूर, तेगूर, ममीगट्टी, क्यारीकोप्प आणि धारवाड या स्थानकांचा समावेश असेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
रेल्वे मंत्रालयाकडून या नियोजित रेल्वे मार्गाला मान्यता मिळाल्यानंतर २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पात रेल्वे प्रशासनाकडून हा प्रस्ताव मांडण्याची शक्यता होती. सन २०१९ मध्ये बेळगाव – धारवाड मार्गाचे रेल्वे प्रशासनाने सर्वेक्षण केल्यानंतर हा रेल्वेमार्ग फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याचा समावेश “पिंक बुक” मध्ये करण्यात आला असून यंदाच्या बजेटमध्ये या मार्गाची तरतूद करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा सपशेल फोल ठरली असून २०२०-२०२१ सालच्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी अनामत रक्कम म्हणून १००० रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
रेल्वेच्या वेबसाईटवर अर्थसंकल्पातील रेल्वेचे पिंक बुक जाहीर झाले. या बुकमध्ये रेल्वे विभागाकडून भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांविषयी माहिती दिली जाते. रेल्वेमार्गाबाबाबत केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे केंद्र शासनाच्या पिंक बुकमध्ये वरील रेल्वेमार्गाचा समावेश झाला आहे.
केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री खासदार सुरेश अगदी यांनी या मार्गासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यांनतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी या रेल्वेमार्गासाठी मंजुरी दिली असून मोफत जमीनही देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. या मार्गाचा फायनल लोकेशन सर्वे लवकरच मांडला जाणार असून बेळगाव – धारवाड या नव्या रेल्वे मार्गामुळे बंगळूर, हुबळीहून बेळगावमार्गे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासाचे अंतर आणि वेळ दोन्हीही कमी होणार आहे .