कांगली गल्ली बेळगाव येथील एकता युवक मंडळाने सामाजिक जाणिवेचे भान राखत नेहमीच नवनवे आणि स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. कोरोना पर्व सुरु झाल्यापासून शहरातील विविध ठिकाणी कोरोना विरोधात अनेक पाऊले उचलण्यात आली होती. इतकेच नव्हे तर ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बेळगावच्या शिवजयंतीचे औचित्य साधून शहर – परिसरात सॅनिटायझेशनची फवारणी करण्यात आली होती. आता चक्क सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत शेडवरील पत्र्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
सदाशिवनगर स्मशानभूमीत शेड उभारण्यात आली होती. या शेडवरील पत्र्यांची दुरवस्था झाली होती. दरम्यान ही बाब लक्षात घेऊन एकता मंडळाच्या पुढाकारातून जवळपास ५० हजार रुपयांचा निधी खर्चून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नवे पत्रे बसविण्याचा उपक्रम केला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या स्मशानभूमीत कोविड मुले मृत पावलेल्या असंख्य रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातील मृत रुग्णांची येथे अंत्यविधीसाठी सोय करण्यात आली होती. कोरोनासारख्या परिस्थितीत आणि इतर वेळीही अंत्यविधीसाठी येथे असुविधा निर्माण होते.
याबाबतीत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ही बाब लक्षात घेऊन एकता युवक मंडळाच्या बाळकृष्ण तोपिनकट्टी आणि ईश्वर प्रेमानंद नाईक ,सिद्धार्थ भातकांडे चेतन चौगुले प्रसाद काकतकर,यांच्या पुढाकारातून अनेक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन स्वतः हे पत्रे बसविले आहेत.
एकता युवक मंडळाकडून सातत्याने राबविण्यात येणारे उपक्रम लक्षात घेऊन तसेच कोविड काळात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल “बेळगाव लाईव्ह’ ने या मंडळाला कोरोना फायटर म्हणूनही पुरस्कृत केले होते.