मार्च महिन्यापासून कोविड-१९ मुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जवळपास 3-4 महिने लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यानंतर हळू हळू उद्योग-व्यवसाय सुरु करण्यात आले. परंतु कोरोनाच्या धास्तीमुळे सर्व व्यवसाय अजूनही ठप्प आहेत.
या दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन वर्ग सुरु करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक पालकांनी आपापल्या परीने आपल्या मुलांचा अभ्यास घेतला आहे. हे ऑनलाईन वर्ग सुरु करण्यासाठी स्मार्ट फोनची आवश्यकता असल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या ऐपतीबाहेर जाऊन केवळ अभ्यासासाठी स्मार्ट फोन घेतले आहेत.
हि सर्व एकंदर परिस्थिती लक्षात घेता, कोविड मुळे उद्भवलेल्या समस्येमध्ये सर्वजण होरपळून गेले आहेत. अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलांच्या अभ्यासक्रमासाठी किमती फोनही घेतले आहेत.
नोकरी, व्यवसाय अडचणीत आल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक पालकांना सध्या शाळेची संपूर्ण फी भरणे शक्य नाही. परंतु शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने फी भरण्यासाठी सूचना जारी करण्यात आली आहे.
याआधी शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरु झाले, त्या दरम्यान अर्धी फी अनेक पालकांनी भरली आहे. उर्वरित फी भरण्यासाठी शाळेने अवधी दिला. परंतु संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडल्यामुळे उर्वरित फी भरणे शक्य नाही. महामारीच्या अशा वेळेत सध्या अनेक सामान्य कुटुंब अडचणीत आली आहेत. यासाठी उर्वरित फीमध्ये सवलत मिळावी, अशी अनेक पालकवर्गातून मागणी करण्यात येत आहे.