दिवसेंदिवस स्मार्ट सिटीअंतर्गत होत असणाऱ्या कामांवर नागरिकांकडून ताशेरे ओढण्यात येत आहेत. दिवसेंदिवस नवनव्या तक्रारी पुढे येत आहेत. कधी रस्ते, कधी गटारींची समस्या, कधी बसथांबे तर कधी आणखी काय? ही स्मार्ट सिटी योजना आहे की शहराला भकास करण्याची योजना आहे, अशापद्धतीने प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
टिळकवाडी हा परिसर मोठा आहे. या परिसरात वावरताना सहजपणे रस्त्यांची आणि येथील गल्लीची ओळख मिळावी यासाठी येथे अनेक मार्गदर्शक नामफलक लावण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत येथे रस्त्यांचे कामकाज सुरु होते. या दरम्यान हे फलक बाजूला ठेवण्यात आले होते. आणि काम संपूर्ण झाल्यानंतर ते फलक तशाच अवस्थेत पडून राहिले आहेत. सध्या यापरिसरातील हे नामफलक कोसळलेल्या स्थितीत आढळून येत आहेत. याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत.
हे नामफलक बसविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मनपाला सूचित केले होते. अवाढव्य खर्च करून हे नामफलक बसविण्यात आपले. रस्त्यांचे कामकाज सुरू असताना बाजूला ठेवण्यात आलेले फलक पुन्हा का बसविण्यात आले नाहीत? पालिका आयुक्त स्मार्ट सिटी कंत्राटदारांना अशा कामांसाठी नोटीस का बजावत नाही? जर हे नामफलक आणखी काही दिवस असेच पडून राहिले तर ते गंजून जातील, आणि त्यानंतर ते भंगारात टाकले जातील. यामुळे सरकारी पैशांची उधळपट्टी होत नाही का? असा संतप्त सवालही येथील जनता उपस्थित करत आहे.
संपूर्ण शहरात स्मार्ट सिटी कामकाज, कामगार आणि कंत्राटदार नवनव्या चुकांसाठी वादाच्या विळख्यात सापडत आहेत. शिवाय तांत्रिकदृष्ट्या विचार न करता या कामांचे नियोजन करण्यात आल्याचेही समोर येत आहे.
त्यामुळे पालिका आयुक्तांनी वेळीच या कामकाजाच्या त्रुटींकडे गांभीर्याने लक्ष पुरवून पैशांचा चुराडा होऊ नये आणि या कामामुळे होणारे नुकसान टाळता यावे, यासाठी गांभीर्याने लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे.