जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान पोहोचलेल्या विविध परिसरांची केंद्रीय अभ्यास पथकाने मंगळवारी भेट देऊन पाहणी केली.
हैदराबादच्या कृषी विभागाचे तेलबियाणे विकास संचालनालयाचे डॉ. मनोहरन तसेच बंगळूरचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता गुरुप्रसाद जे. यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिसरांची पाहणी करून माहिती घेतली.
बेळगावमध्ये आलेल्या या केंद्रीय अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्वागत केले आणि नुकसानग्रस्त भागांविषयी माहिती दिली.
या पथकाने सर्वप्रथम हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्री गावाला भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. 1.17 एकर भागात पेरणी केलेले सोयाबीन पीक संपूर्णपणे नष्ट झाल्याचे निदर्शनास आले. रुपये 15 हजार प्रति एकर खर्चून 15 क्विंटल पीक अपेक्षित होते. परंतु संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बडकुंद्री भागातील सुमारे 30 हेक्टर प्रदेशातील पीक संपूर्ण नष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सोयाबीन पिकासाठी बँकेतून कर्ज मिळाले होते का? असा प्रश्न पथकाचे प्रमुख मनोहरन यांनी शेतकऱ्यांना विचारला असता यावेळी सोयाबीनसह इतर पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी दिली. यासंदर्भात सरकारचे मुख्य सचिव महांतेश कवटगीमठ यांच्याशी चर्चा केली असता, प्रत्येकवर्षी अशाप्रकारे नुकसान होते, अशी माहिती त्यांनी केंद्रीय पथकाला दिली.
यावेळी हिरण्यकेशी नदी नदीतीरावरील चौगला यांच्या शेतजमिनीतील सोयाबीन आणि परिसरातील ऊस पिकाची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी नदीतीराचे रुंदीकरण करण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. माजी खासदार शशिकांत नाईक यांनी दरवर्षी महापुरामुळे उद्भवणाऱ्या समस्येचे स्पष्टीकरण दिले.
त्यानंतर होसुर आणि इंगळी गावातील शेतजमिनींना भेट देऊन पाहणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, आणि कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौड पाटील यांनी हुक्केरी, गोकाकसह जिल्ह्यात उद्भवलेल्या पिकांच्या नुकसानी बद्दल माहिती दिली.
यावेळी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. , उपविभाग अधिकारी अशोक तेली, कृषी विभागाचे उपसंचालक एच. डी. कोळेकर, फलोत्पादन विभागाचे उपसंचालक रवींद्र हकाटी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.