हलगा-मच्छे बायपासबाबतीत हायकोर्टाची स्थगिती असूनही वर्क ऑर्डर नसताना कामकाजाला प्रारंभ करण्यात आला आहे. याविरोधात कर्नाटक रयत संघाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
हलगा-मच्छे बायपासबाबत खटला न्यायप्रविष्ट आहे. हायकोर्टाने स्थगिती देऊनही अचानक हे कामकाज सुरु करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कणबर्गी येथे स्कीम नंबर ६१ प्रमाणे १६० एकर पिकाऊ जमीन आणि अनगोळ येथील स्कीम नंबर ६२ प्रमाणे १५६ एकर पिकाऊ जमीन बुडणे संपादित करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. या सर्व गोष्टी शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या आहेत, हे कामकाज त्वरित थांबवण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
बेळगाव तालुक्यातील हलगा-मच्छे बायपास मार्गासाठी कोणतीही वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही. परंतु तरीही ठेकेदारांनी आणि राज्य सरकारने मिळून याठिकाणी बेकायदेशीरपणे कामकाजाला सुरुवात केली आहे. हा बायपासचा मार्ग कॅम्प परिसरातील फिश मार्केटपासून ० किलोमीटरवर प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु प्रस्तावित मार्गात अचानक बदल करून हलगा-मच्छे येथे बायपासचे कामकाज अचानकपणे सुरु करण्यात आले आहे. याविरोधात शेतकऱ्यांच्यावतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. हा खटला न्यायालयात प्रलंबित असून हायकोर्टाने या बायपासच्या कामाला स्थगिती दिली आहे. परंतु तरीही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे कामकाज पोलीस संरक्षणात सुरु करण्यात आले आहे.
याचप्रमाणे बेळगाव शहर प्राधिकरणतर्फे (बुडा) कणबर्गी आणि अनगोळ येथील पिकाऊ जमिनी संपादित करण्याचा घाट घालण्यात आला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असून याच जमिनीद्वारे शेतकरी आपला उदरनिर्वाह चालवितात. उपजीविकेचे साधंच हिरावून घेण्याचा प्रकार बुडाकडून करण्यात येत आहे. भूसंपादन कायदा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानीचा आहे. यामुळे अनेक शेतकरी अडचणीत येतील. यासाठी हा प्रकार वेळीच थांबविण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
हे कामकाज त्वरित थांबविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. हे निवेदन सादर करताना कर्नाटक राज्य रयत संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी सिद्दम्मन्नवर, तालुकाध्यक्ष राजू मरवे, तानाजी हलगेकर, हणमंत बाळेकुंद्री, अनिल अनगोळकर, भुमेष बिर्जे, रमाकांत बाळेकुंद्री, नितीन पैलवानाचे, भैरू कंग्राळकर, मनोहर कंग्राळकर यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.