शहर आणि परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून नागरिक प्रशासनावर आणि प्रशासन नागरिकांवर आरोप करत आहे. प्रशासनाच्यावतीने कचरा इतरत्र न टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे तर अनेक भागातील नागरिक उघड्यावर कचरा टाकताना दिसून येत आहे.
खासबाग येथील वॉर्ड क्रमांक २१ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा साचत होता. या कचऱ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. नागरिक या समस्येला वैतागले होते. येथील नागरिकांना सातत्याने मनपा आरोग्य निरीक्षक शिल्पा कुंभार आणि वॉर्ड सुपायवायजर संजय पाटील यांनी कचरा टाकण्यास मनाई केली होती. परंतु येथील नागरिक याचठिकाणी कचरा टाकताना दिसून येत होते.
यावर उपाय म्हणून बंगळूरचा सुपरवायझर नितीन देमट्टी, सचिन देमट्टी तसेच या भागातील युवा कार्यकर्ते विजय जाधव यांच्या प्रयत्नातून या ब्लॅक पॉइंटवर तोडगा काढण्यात आला आहे.
याठिकाणी कचरा टाकणाऱ्यांसाठी विशेष सूचना फलक लावण्यात आला असून कचरा टाकणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारण्याची सूचना या फलकावर करण्यात आली आहे. हा फलक लावल्यामुळे येथील आजूबाजूच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.