सामान्यतः अनेक नागरिक आपले घर बसविताना आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा पाहूनच घर निवडतो. परंतु बेळगाव हे असे शहर आहे ज्या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा परतून जाण्याचे नाव घेत नाही. चारही बाजुंनी निसर्गाने वेढलेल्या आपल्या बेळगाव शहराची गोष्टच न्यारी. त्यात बेळगावची बाजारपेठ म्हणजे विविधतेने नटलेली. या बाजारपेठेत फेरफटका मारणे म्हणजे एक पर्वणीच असते.
विशेष म्हणजे बेळगाव शहरात ज्या ज्या ठिकणी भाज्यांची बाजारपेठ आहे त्याठिकाणी जाऊन भाजी खरेदी करणे यात एक वेगळेच सुख आहे. आजूबाजूच्या तालुक्यातील भाजीपाला याठिकाणी येतो. दररोज ताजी आणि नानाविध प्रकारची भाजी बाजारपेठेत मिळते. घरी बसून कंटाळा आला असेल तर सहजपणे या बाजारपेठेत आपण खरेदीसाठी जाऊन आपला कंटाळा दूर करू शकतो शिवाय निरनिराळी भाज्या, फळे, फुले यांनी बहरलेली बाजारपेठ पाहून विरंगुळा मिळतो हेही तितकेच खरे.
पावसाळ्याच्या मौसमानंतर सध्या अधून – मधून पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे हंगामी भाजीपाला बाजारपेठेत दाखल झाला आहे. बाजारपेठेत एक फेरफटका मारला असता संपूर्ण बाजारपेठेत रंगाचे आच्छादन पसरल्यासारखे जाणवते. शहरच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत म्हणजेच रविवार पेठेत अनेक भाजीविक्रेते आहेत. याठिकाणी भाज्यांची रास आपल्याला दिसून येते. फ्लॉवर, कोबी, मेथी, बिनीस, लिंबू, गाजर, मटार, कोथिंबीर, वांगी, भोपळा, शेपू, टोमॅटो, ढोबळी मिरची, पालक, पुदिना, गवार, काकडी, दुधी, तोंडली, फागली, कांद्याची पात, घेवड्या, श्रावण शेंगा, बीट, कारली, दोडकी, बटाटे, याशिवाय सोललेले मटार, मोड काढलेले कडधान्य, आणि बच्चे कंपनीला सदाबहार आवडणारे स्वीट कॉर्न! या आणि अशा अनेक भाज्यांनी सध्या बाजारपेठ तुडुंब भरलेली आहे.
लाल, हिरव्या,पिवळ्या अशा विविध रंगाच्या भाज्यांनी बहरलेल्या बाजारपेठेत फळांचीही हजेरी तितकीच आकर्षक वाटत आहे. केळी, मोसंबी, कलिंगड, चिकू, डाळिंबात, पेरू आणि आरोग्यवर्धक खरबूजही ठिकठिकाणी दिसून येत आहे. सध्या सफरचंदचा सिझन असल्यामुळे बाजारपेठेत ठिकठकाणी सफरचंद विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. साधारण ८० रुपये किलोच्या आसपास हे सफरचंद आपल्याला मिळतील.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सध्या अनेक जण घरीच बसून आहेत. याकाळात मॉल, सिनेमागृह, पर्यटन स्थळ या सर्व ठिकाणी जाण्यास बंदी आहे. अशावेळी आपण खबरदारी घेऊन बाजारपेठेची सवारी करूच शकतो. पार्सल मागवून पॅकेड फूड ची सवय लागलेली अनेक बच्चे कंपनी आहेत. पण सध्या निसर्गाने दिलेल्या या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन आपल्या कुटुंबाला स्वच्छ, पारंपरिक आणि आरोग्यपूर्ण असे पक्वान्न खाऊ घालण्याची ही सुवर्णसंधी आहे. इतरवेळी अनेक रासायनिक गोष्टी वापरून बनवलेल्या अन्नाचा आनंद प्रत्येक जण घेतो. परंतु बाजारपेठेत ताजा भाजीपाला उपलब्ध असताना नवनवे पक्वान्न करून आपण आपले आरोग्य सांभाळण्यासाठी मिळालेल्या या संधीचा नक्कीच फायदा करून घेऊ शकतो. शिवाय मोबाईल आहेच आपल्या संगतीला… नवनव्या रेसिपीज बघून आजच पंच क्वान्न करण्याच्या तयारीला लागण्यास काहीच हरकत नाही..
Article courtasy:aab