बेळगाव स्मार्ट सिटी म्हणून घोषित झाल्यापासून शहर परिसरात अनेक विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. परंतु हि विकासकामे नसून भकासकामे असल्याचे जाणवत आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात सुरु असलेली या सर्व विकासकामांचे वाभाडे निघत आहेत. प्रत्येक ठिकाणी दर्जाहीन कामे होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
या विकासकामांतर्गतच होणाऱ्या कॉलेज रोड येथील रस्त्याच्या कामाबाबतही आता एक तक्रार पुढे आली आहे. हे रस्ते बांधकाम करण्यात येत असलेल्या ठिकाणी रस्त्यांची उंची जास्त झाली असून गटारींची व्यवस्था करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. मागील ३५ – ४० वर्षांपूर्वी असलेल्या गटारी जैसे थे परिस्थितीत असून या गटारींमध्ये माती आणि कचरा तुंबला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळविले असता ट्रॅक्टरच्या माध्यमातून या गटारींमधील काही माती काढण्यात आली. त्यावेळी ४ ट्रॅक्टर इतकी माती या गटारींमधून निघाली.
सर्वच ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या ढिसाळ नियोजन करण्यात आल्यामुळे कॉलेज रोड वर सुरु असलेल्या रस्त्याच्या कामकाजात गटारींची सोय करण्यात आली नाही. शिवाय गटारींपेक्षा रस्त्याची उंची अधिक झाल्यामुळे रस्त्यावरील पाणी ओघळून गटारींवरून वाहून रहिवासी इमारतीत शिरत आहे.
त्याचा फटका येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकारी तसेच आमदार अनिल बेनके यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. परंतु आजवर कोणीही याकामकाजाबाबत लक्ष पुरविले नाही. हे कामकाज मागील ४ महिन्यांहून अधिक काळापासून सुरु असून इतका खर्च करून करण्यात येत असलेले हे रस्ते लवकरच उखडण्याची शक्यता आहे.
बेळगाव लाईव्ह ने या स्मार्ट सिटीच्या कामकाजातील त्रुटी वारंवार निदर्शनास आणून दिल्या आहेत. परंतु याकडे कोणताही अधिकारी गांभीर्याने लक्ष पुरवताना दिसून येत नाही. रोजच्या रोज अनेक नागरिकांच्या तक्रारी या स्मार्ट सिटी कामविरोधात पुढे येत असून, स्मार्ट सिटी साठी करोडो रुपये खर्चून करण्यात येत असलेली हि कामे आता प्रत्येकाला भोंगळ वाटत आहेत. शिवाय करण्यात येत असलेला हा अवाढव्य खर्च वायफळ जाण्याची चिन्हे दिसत असून शहराची स्थिती भकास होण्याच्या मार्गावर आहे.