दिल्लीत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाची बातमी ही धक्कादायक असून त्यांच्या निधनाने बेळगावच्या आणि विशेष करून रेल्वे विभागाच्या विकासाला खीळ बसल्याची चर्चा जनेतून व्यक्त होत आहे. रेल्वे राज्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अतिशय वेगाने रेल्वे विभागाच्या विकासाला चालना देणारे खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनाने हा विकास ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.
बेळगावच्या रेल्वे स्थानकावरून प्रवासी वाहतूक तसेच व्यावसायिकरित्या रेल्वे विभागाचा विकास, रेल्वेस्थानकाच्या कायापालट, किसान रेल्वे यासारख्या अनेक योजना खासदार सुरेश अंगडी यांनी बेळगावमध्ये राबविण्यास सुरवात केली होती. आगामी काळात बेळगावच्या रेल्वे स्थानकाला उच्च दर्जा प्राप्त करून देण्यासाठी धडपडत असणारे सुरेश अंगडी यांनी केवळ रेल्वेस्थानकापुरता विचार न करता सांबरा येथील विमानतळाचाही कायापालट करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच खानापूर रोडवरील कमकुवत झालेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करून तो पूल नव्याने उभारण्यासाठीही खासदार अंगडी यांचा मोलाचा वाटा होता.
मागील ३ निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर म्हणावी तशी विकासकामे त्यांनी केली नाहीत, यासाठी ते टीकेचे धनी झाले. त्यानंतर मागील निवडणुकीत पुन्हा खासदारपदी निवडून आलेल्या सुरेश अंगडी यांनी बेळगावच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. चौथ्यांदा खासदारपदी निवडून आल्यानंतर त्यांनी बेळगावच्या विमानतळाचा ‘उडान’ मध्ये समावेश केला. विमानतळाच्या विकासासाठी त्यासोबतच रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी त्यांनी अनेक योजना आणि उपक्रम राबविण्याचे जाहीर केले होते. बेळगावच्या रेल्वे स्थानकाचा विकास विमानतळाच्या धर्तीवर करण्याचे त्यांनी ठरविले होते.
बेळगाव शहर ही टायर टू सिटी मध्ये मोडत असल्याने केंद्राच्या नियमानुसार अंगडी यांनी ‘गेटलेस सिटी’बनवण्याचा मानस केला होता तीन उड्डाण पुलांची निर्मिती होऊन नवीन उड्डाण पूल मंजुरी मिळवली होती तर काही प्रस्तावित होती त्यामुळे रेल्वे गेट लेस बेळगाव ही संकल्पना अधुरीच असणार आहे.लोंढा गोवा रेल्वे डब्लिंगच्या कामात अनेक व्यत्यय होते वन खात्या कडून ना हरकत स्थानिकांच्या समस्या होत्या अंगडी यांनी त्यावर देखील काम सुरू केले होते या प्रोजेक्टला देखील अंगडी कमतरते मुळे खीळ बसण्याची शक्यता आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकावर वाशिंग लोकोमोटिव्ह शेड उभारण्यात येणार होते रेल्वेची दुरुस्ती आणि वाशिंग या ठिकाणी होणार होती हा प्रोजेक्ट अंगडी यांच्या प्रस्तावात होता आता ती केवळ स्वप्नचं बनून राहण्याची शक्यता आहे इतकेच काय तर बेळगाव सावंतवाडी आणि बेळगाव कराड या रेल्वे मार्ग देखील स्वप्न बनण्याची शक्यता आहे.ज्या राज्याचा रेल्वे मंत्री त्या राज्याचे काम अधिक हे समीकरण पहिला पासूनच आहे त्यामुळे अंगडी यांच्या जाण्याने बेळगाव रेल्वेची हानी होणार आहे.
कॅबिनेट म्हणून मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यमंत्री म्हणून के एच मुनियप्पा यांच्या पेक्षा अंगडी यांचे रेल्वेतील कर्नाटकासाठीचे काम नक्कीच दिलासादायक आहे.बेळगाव शहराला दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी कामकाजही सुरु केले.परंतु त्यांच्या अचानक जाण्याने बेळगाव शहराच्या विकासाला खूप मोठा फटका बसला आहे. त्यांच्या जाण्याने बेळगाव शहराचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने जनतेमध्ये शोककळा पसरली आहे.