सीमाभागात मराठी माणसाला कोणी वाली नाही.. मराठी माणसाला पाठिंबा देण्यासाठी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारा आणि मराठी माणसासाठी आवाज उठविणाऱ्या नेतृत्वाची नेहमीच मागणी होत आहे. पुढील महिन्यात अंगडी यांच्या निधनानंतर पोट निवडणुक जाहीर झाली आहेत.
नुकतेच रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाले. त्यानंतर पुन्हा पोटनिवडणुकीच्या आणि उमेदवार निवडीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.भाजप कडून अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे भाजपकडून उमेदवारा बाबत चर्चा सुरू असताना महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील एक उमेदवार द्यावा का याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत 50 हुन अधिक उमेदवार देत लक्ष वेधून घेणाऱ्या समितीने यावेळी एक तगडा उमेदवार द्यावा याविषयी सोशल मीडियावर मागणी वाढू लागली आहे. सध्या समितीतील गट- तट बाजूला सारून पुन्हा एकदा सक्षम उमेदवार उभे करून महाराष्ट्र एकीकरण समितीने तो निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत याचीही चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.
राष्ट्रीय पक्षांशी अनेक मान्यवर नेतेमंडळी जोडली गेली आहेत. परंतु मराठी माणसाच्या आणि सीमाप्रश्नाच्या बांधिलकीशी जोडला गेलेला एखादा तरी नेता महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने उभारण्यात येईल का? याबद्दलही जोरदार चर्चांना ऊत आला आहे.समितीने लोकसभा लढवल्यास एक उमेदवार देऊन लाखभर मते मिळवल्यास याचा परिणाम पक्ष संघटनेवर नक्कीच होऊन भविष्यात ग्राम पंचायत तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत याचा फायदा मराठी उमेदवाराना होणार अशीही चर्चा सुरू झाली आहे.
मागील वीस वर्षांपासून सुरेश अंगडी हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र यावेळी मराठी माणसांसाठी एक संधी चालून आहे. ती दवडू नये अशीही चर्चा सुरू आहे. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार उभा करून त्याला निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करू अशा कमेंट्स कार्यकर्त्यांनी एका फेसबुक पेजवर केल्या आहेत.
ही एकच सुवर्णसंधी समितीला चालून आली आहे. समितीचे अस्तित्व संपले आहे असे म्हणणाऱ्याना दाखवून द्यायची वेळ आली आहे समितीमधून एकही नेता मराठी माणसासाठी ताकदीने उभा राहू शकत नाही. सीमाभागात मराठी माणसाचा आवाज दडपला जातो. मराठी माणसाला नेहमी दुजाभाव देण्यात येतो. या सर्वांवर एक उपाय म्हणून एक सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि या समितीतील नेते अ-ब-क-ड अशा विविध गटांमध्ये दुभाजले गेले आहेत. तर काहींनी गट-तटाच्या राजकारणाला कंटाळून राष्ट्रीय पक्षांशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे यावेळी कोणताही विचार न करता एक सक्षम उमेदवार उभा करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आहे. आणि यावर कमेंटसचा पाऊस पडत आहे.
दोन विधानसभा व चार विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. दि. 28 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार द्यावा यावर तुमचे काय मत आहे? असे फेसबुक पेजवर पोस्ट टाकण्यात आली आहे. या पोस्टवर समितीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उमेदवार द्यावा आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत असेही म्हटले आहे. समिती राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांचा मिळून तरुण उमेदवार असावा अशी मागणी देखील सोशल मीडियावर होत आहे.
या सर्व गोष्टीचा आणि एकंदर परिस्थितीचा विचार करता सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीने यावर गांभीर्याने विचारमंथन करून एकसंघ होऊन वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ठोस मत द्यावे, आणि उमेदवार निवडीबाबत प्रत्येकाला विश्वासात घेऊन समितीतील पडलेली खिंडार बुजवावी अशी मागणी मराठी जनतेतून करण्यात येत आहे.