कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले असतानाच यावर अजूनही कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध झाली नाही. परंतु अनेक नागरिक मात्र बेजबाबदारपणे वावरताना दिसून येत आहेत. शहर तसेच परिसरात अशा बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दिवसेंदिवस अधिकाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून यासंदर्भात सरकारने खबरदारीसाठी नियम जारी केले आहेत. यामध्ये मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि अनेक गोष्टींचा समावेश नियमावलीत करण्यात आला आहे. अशा परिस्थितीतही नागरिक मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. दुचाकीसह चारचाकी वाहनधारक, आणि बाजारपेठेत विनमस्क फिरणाऱ्यांवर गुरुवारी महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये तब्बल ३९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणू वेगाने आपले हातपाय पसरत असून यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शिवाय कोरोनाबाधितांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही नागरिक मास्क वापरताना दिसून येत नाहीत. अशा विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसाठी हि विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या कार्रवाईअंतर्गत विनमस्क फिरणाऱ्यांवर प्रत्येकी २०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. ठिकठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत ३९ हजाराहून अधिक दंडाची रक्कम महापालिकेने वसूल केली आहे. यामध्ये केवळ बाजारपेठेतील पादचारीच नाही तर वाहनधारकांचाही समावेश आहे.
ही कारवाई महापालिकेच्या पर्यावरण सहाय्यक अभियंत्यासह स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. नागरिकांमध्ये मास्क ची संपूर्णपणे जागृती होईपर्यंत ही कारवाई अशाच पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.