Tuesday, January 21, 2025

/

वाय बी सरांचे विचार पुढे नेणे हीच श्रद्धांजली

 belgaum

येळ्ळूरचे सुपुत्र आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या वाय बी चौगुले सरांचे 21 जुलै रोजी निधन झाले आज त्यांचा 12 वा दिवस. यानिमित्त त्यांच्या एका कार्यकर्त्याने घेतलेला हा त्यांच्या कार्याचा आढावा

येळ्ळूर, बेळगाव तालुक्यातील क्रांतिकारी गाव .पुरोगामी विचारांनी प्रेरित असलेल्या या गावचे कर्तुत्वान सुपुत्र वाय बी चौगुले सर! शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे लक्षात घेऊन गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी विश्व भारत सेवा समितीची स्थापना केली आणि तिची सुरुवात येळ्ळूरपासून केली त्या येळ्ळूरच्या शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून वाय बी चौगुले सर रुजू झाले आणि आपल्या कारकिर्दीत त्यानी हजारो विद्यार्थी घडविले .

संस्थेच्या विविध शाखेमध्ये काम करीत असताना त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबविले. त्यामुळेच त्यांचे अनेक विद्यार्थी आज देशाच्या विविध भागात वैज्ञानिक, अभियांत्रिकी, सहकार ,शैक्षणिक क्षेत्राबरोबरच उद्योग-धंद्यात उत्तम प्रगती साधून आहेत

Yb chougule
Yb chougule

वाय बी म्हणजे ध्येयवादी आणि भविष्याचा वेध घेऊन कार्य करणारी व्यक्ती .त्यांच्या या प्रयत्नातून जसे अनेक विद्यार्थी घडले तशाच अनेक संस्थाही घडल्या. त्यांनी सुरू केलेल्या नवहिंद क्रीडा केंद्राद्वारे नवहिंद पतसंस्थेबरोबरच महिलांसाठी सुद्धा संस्था सुरू केल्या त्‍यामुळे त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता आज वेगवेगळ्या ठिकाणी प्रगती साधून आहे. शिक्षण क्षेत्रात कार्य करीत असतानाच त्यांनी अनेक लढ्यामध्ये सक्रिय भाग घेतला.

सीमाप्रश्न सुटावा यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यात त्यांनी स्वतःला झोकून देऊन कार्य केले. समितीच्या प्रत्येक आंदोलनात, मोर्चामध्ये ,जागृती सभांमध्ये अथवा निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी जे कार्य केले ते सर्वश्रुत आहे.

Yb chougule
आर्थिक कणा मजबूत असल्याशिवाय प्रगती शक्य नाही हे लक्षात घेऊन त्यांनी सुरू केलेल्या नवहिंद सहकारी सोसायटीच्या 16 शाखा ,नवहिंद मल्टीपर्पज सोसायटी च्या 28 शाखा आणि महिला सोसायटीच्या 6 शाखा आज कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यात कार्यरत आहेत ते एवढ्यावरच थांबले नाहीत .

त्यांनी जयशंकर कालकुंद्रीकर यांच्या नावे सुरू केलेल्या सहकारी सोसायटीच्याही अनेक शाखा कार्यरत आहेत या सर्व संस्थांच्या मुळे अनेक कार्यकर्ते तयार झाले अनेक उद्योजकांना लहान मोठा उद्योग करण्यासाठी मदत झाली हे विसरून चालणार नाही. त्यांनी जसे अनेक मल्ल घडविले तसेच अनेक शिलेदार घडवले. त्यांचा अभ्यास दांडगा होता त्यामुळेच त्यांनी अनेक ठिकाणे उत्तम अशी व्याख्याने दिली. दैनिक रणझुंजार मध्ये ते सातत्याने लिखाण करायचे.

Yb chougule
असा हा दूरदृष्टी असलेला ,अनेकांना घडविणारा, शिक्षण ,अर्थकारण ,राजकारण आणि समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारा येळ्ळूरचा सुपुत्र आज आपल्यातून निघून गेला आहे .त्यांनी दिलेले विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल
-अनंत लाड पत्रकार बेळगाव

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.