शहरातील महाद्वार रोड येथील एका हॉस्पिटलमध्ये एका महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर उपचाराच्या बिलासाठी तिच्या अंगावरील दागिने लंपास करण्याचा प्रयत्न झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तथापि आवाज उठविल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना दागिने परत मिळाले आहेत.
शहरातील महाद्वार रोड येथील एका हॉस्पिटलमध्ये रुग्ण महिलेच्या मृत्यूनंतर तिचे दागिने काढून घेण्याचा प्रकार हॉस्पिटलमधील कर्मचारीवर्गाने केला. परिणामी हॉस्पिटलचे बिल भरण्यास असमर्थ ठरलेल्या कुटुंबीयांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून जाब विचारला.
मृताच्या अंगावरील दागिने लंपास करण्याच्या या प्रकारामुळे संबंधित हॉस्पिटलमध्ये बराच काळ गदारोळ माजला. अखेर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी लंपास केलेले दागिने परत केल्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला. दरम्यान, सदर हॉस्पिटलमध्ये असे प्रकार नेहमीच घडत असल्याची चर्चा सुरू आहे.
याबाबतची माहिती अशी की, बैलहोंगल येथून आलेली ही पार्वती बस्वानाप्पा होळी नामक एक महिला आजाराने मृत्यू पावली. तीचा मृतदेह ताब्यात देण्याआधी हॉस्पिटलने 3 लाख रुपये भरण्याचा तगादा लावला. तत्पूर्वी आगाऊ स्वरुपात देखील मोठी रक्कम भरून घेण्यात आली होती. मात्र महिलेच्या मृत्यूनंतर बिल भरणा राहून गेल्यामुळे हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. या प्रकाराने त्या महिलेचे नातलग संतप्त झाले व त्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला याचा जाब विचारला.
तसेच पोलिसांनाही पाचारण केले. या प्रकारामुळे हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ माजला होता. त्यानंतर दागिने परत करण्यात आले. मात्र सध्या संबंधीत हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या या माणुसकी शून्य कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.