दहा वर्षापूर्वी वडिलांचे छत्र हरपून देखील हालाखीच्या परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थीनीचा सत्कार ग्रामस्थांनी केला आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेत किणये पंचक्रोशीतील मराठी शाळांमध्ये सर्वाधिक गुण संपादन करून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कर्ले येथील अत्यंत गरीब कुटुंबातील वैशाली पाटील या विद्यार्थिनीचा श्री विठ्ठल रखुमाई भारुड भजनी मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
गोकुळाष्टमीनिमित्त कर्ले (ता. बेळगांव) येथील श्री विठ्ठल रखुमाई भारुड भजनी मंडळाच्या कार्यालयामध्ये काल गुरुवारी सदर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारुड भजनी मंडळाचे अध्यक्ष सी. ए. सांबरेकर यांच्या हस्ते वडिलांचे छत्र हरपलेली गुणवंत विद्यार्थिनी वैशाली रवळू पाटील हिचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल वैशाली पाटील हिने कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी नवनाथ खामकर, रवळू तारीहाळकर, खेमाजी खामकर, बाळू कुंदप आदींसह भारुड भजनी मंडळाचे सदस्य वैशालीची आई व गावकरी उपस्थित होते.
द. म. शिक्षण मंडळाच्या ज्योती हायस्कूल कर्लेची विद्यार्थिनी वैशाली रवळू पाटील हिने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 85 टक्के गुण संपादन केले आहेत. किणये पंचक्रोशीत पांच मराठी माध्यमिक शाळा असून या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैशालीने मिळवलेले गुण सर्वाधिक आहेत. वैशाली लहान असतानाच म्हणजे आठ -दहा वर्षापूर्वी तिचे वडील रवुळ यांचे अपघाती निधन झाले.
घरच्या कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर वैशालीची आई आणि आजीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिला लहानाचे मोठे केले आहे. पाटील कुटुंबीयांची घरची परिस्थिती हलाखीची असून देखील वैशालीने दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी नोंदविली हे विशेष होय. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.