Sunday, December 29, 2024

/

कमांड कंट्रोल सेंटर करा “ॲक्टिव्ह” : शहरवासीयांची मागणी

 belgaum

बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने विश्वेश्वरय्यानगर येथे “कमांड कंट्रोल सेंटर” स्थापन केले आहे. परंतु सध्या हे कमांड कंट्रोल सेंटर नेमकं कोणतं काम करतय? असा प्रश्न पडू लागला आहे. तसेच सध्याच्या कोरोना संकटकाळात तातडीच्या सेवेसंदर्भात माहिती देण्यासाठी या सेंटरचा वापर केला जावा, अशी मागणी केली जात आहे.

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बेळगांव शहरातील वाहतूक तसेच अन्य सार्वजनिक क्षेत्रांवर नजर ठेवण्यासाठी विश्वेश्वरय्यानगर येथे कमांड कंट्रोल सेंटरची स्थापना करण्यात आली. मात्र सध्याच्या घडीला सदर कमांड कंट्रोल सेंटर नेमके काय काम करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्याच्या कोरोना संकटकाळात प्रशासकीय व आरोग्य खात्याशी संबंधित प्रत्येक यंत्रणेवरील ताण वाढला आहे. प्रसार माध्यमातून याबाबत वेळोवेळी माहिती दिली जात आहे. मात्र यामध्ये आजतागायत एकदा देखील स्मार्ट सिटीच्या कमांड कंट्रोल सेंटरचा उल्लेख आलेला नाही.

सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव काळात जे हेल्पलाइन नंबर देण्यात आले आहेत, त्या नंबरवर व्यवस्थित मार्गदर्शन करण्याऐवजी प्रश्नांचा भडिमार करून मदतीच्या अपेक्षेने फोन करणाऱ्या व्यक्तीला भंडावून सोडण्यात येते. या पद्धतीने शेकडो इमर्जन्सी कॉल्स व्यवस्थित हाताळले जात नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी निराशा पडत आहे. कोरोनाच्या नांवाने सध्या जिल्ह्यासह शहर परिसरातील खाजगी इस्पितळातून सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जात आहे.

यासंदर्भात जिल्हा पालकमंत्री खाजगी इस्पितळातवर कडक कारवाईची भाषा करतात. परंतु प्रत्यक्षात आजतागायत किमान बेळगाव शहरातील एकाही खाजगी इस्पितळावर कारवाई झालेली नाही. प्रत्येक हॉस्पिटल आपल्याला मन मानेल त्या पद्धतीने रुग्णांवरील उपचारासाठी पैसे उकळत आहे. कोरोनासंदर्भात राज्य शासनाच्या आरोग्य खात्याने राज्यातील सर्व इस्पितळांसाठी उपचाराचा ठराविक दर निश्चित केला आहे. तथापि शहरात याचे खुलेआम उल्लंघन केले जात आहे याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असून सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयामध्ये उपचाराचे समान दर आकारले जावेत.

बेंगलोर आदी शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक वॉर्डांमध्ये हेल्पलाइन नंबर असून त्या ठिकाणी नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. बेळगांवमध्ये मात्र अद्यापपर्यंत या पद्धतीची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. परिणामी आपत्कालीन परिस्थितीत वेळी सर्वसामान्य नागरिकांवर बिकट परिस्थिती ओढावत आहे. सध्याच्या कोरोना संकट काळात शहरात अशा पद्धतीच्या अनेक समस्या निर्माण झालेले आहेत. यासंदर्भात सर्वसामान्य जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी कोणतीच सरकारी यंत्रणा कार्यरत नाही.

या एकंदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सध्या “सायलेंट” मोडवर असलेल्या बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या कमांड कंट्रोल सेंटरला “ॲक्टिव्ह” करून त्याचा सदुपयोग करावा, अशी मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.