Tuesday, May 7, 2024

/

स्मार्ट सिटीच्या नांवाखाली बेळगांवची अक्षरशः लूट – माजी महापौर सातेरी

 belgaum

बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांसह संबंधित अभियंत्यांनी व्यवस्थित नियोजन केले नसल्यामुळे स्मार्ट सिटीच्या नांवाखाली सध्या बेळगाव शहरात अक्षरशा लूट चालली आहे, असे परखड मत माजी नगरसेवक संघटना बेळगावचे अध्यक्ष माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी व्यक्त केले आहे.

बेळगाव स्मार्ट सिटी योजना आणि त्यामुळे झालेली शहराची वाताहत यासंदर्भात “बेळगाव लाईव्ह”शी बोलताना माजी महापौर सातेरी यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, 6 लाख लोकसंख्या असलेल्या बेळगांव शहराचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करण्यासाठी शासनाकडून गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत. मात्र हे प्रयत्न करताना बेळगांव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांसह संबंधित अभियंत्यांना स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामांचे व्यवस्थित नियोजन करता आलेले नाही. या लोकांनी शहरातील विकास कामांचे नियोजन करताना स्थानिक कंत्राटदारांना विश्वासात घेतले असते तर सर्व विकासकामे नियोजनबद्धरीत्या होण्यास मदत झाली असती. याखेरीज स्मार्ट सिटीची योजना अंमलात आणताना बेळगांव शहरातील जुन्याजाणत्या लोकप्रतिनिधींना अथवा ज्यांना शहराची उत्तम माहिती आहे अशा लोकांना त्यांनी विश्‍वासात घेतले नाही, असे ॲड सातेरी यांनी सांगितले.

सध्या एखाद दुसरा कंत्राटदार वगळता बेळगाव स्मार्ट सिटीची कामे करणारे सर्व कंत्राटदार बाहेरून आलेले आहेत. त्यांना या शहराशी कोणतेही देणे – घेणे नाही. बेळगांवबद्दल आत्मीयताच नसल्यामुळे हे कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करणे आणि पैसा घेऊन जाणे याशिवाय काहीही करत नाहीत. या सर्व कारणांमुळे शहराचा विकास होण्याऐवजी स्मार्ट सिटीच्या नांवाखाली बेळगांव भकास झाले आहे.

 belgaum
adv nagesh sateri ex mayor bgm
adv nagesh sateri ex mayor bgm

टिळकवाडी वगैरे कांही मोजके भाग वगळता संपूर्ण शहर अक्षरशः भकास परिस्थितीमध्ये आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहराची वाताहात झाल्यामुळे सध्या लोकांना अनंत अडचणींना आणि त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बेळगांवची जनता शांत आहे म्हणून हे सर्व चालले आहे. परंतु एक ना एक दिवस आम्हा सर्वांना याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याची वेळ येणार आहे.

बेळगांवच्या जनतेवर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असे वाटत असेल तर स्मार्ट सिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी स्वतः बेळगाव शहरात एकदा फिरून बघावे. विकास कामे दर्जेदार होत आहेत की नाहीत? याची पाहणी करणे, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे, हे सर्वकांही त्यांना करावे लागेल.

सध्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली बेळगावात अक्षरशः लूट चालली आहे असे माझे स्वतःचे स्पष्ट मत आहे. ही लूट जर थांबली नाही तर मी स्वतः माजी नगरसेवक संघटनेच्या माध्यमातून हा प्रश्न हातात घेण्याचा विचार करत आहे, असेही माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी शेवटी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.