उत्तर कर्नाटकात पूर आला. पण महसूल मंत्र्यांनी याकडे फिरकून देखील पहिले नाही. बंगळूर मध्ये बसून सर्व परिस्थितीचा नुसता अंदाज घेणाऱ्या महसूल मंत्र्यांनी जरा बंगळूरबाहेर डोकावून पाहावे, असा टोला केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी लगावला आहे. आज बेळगावमध्ये काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बेळगाव, विजापुरात एकदा महसूल मंत्र्यांनी भेट द्यावी, जिल्ह्यात चार खासदार आहेत, परंतु कोणालाही कोणत्याच गोष्टीचे देणे-घेणे नाही, अशा अविर्भावात हे खासदार वावरतात, चारही जणांनी मिळून कार्य केले तर बऱ्याच समस्यांवर मार्ग निघू शकेल, परंतु हे सर्व खासदार केवळ आपापल्या भागापुरते तसीमित आहेत, असा आरोप जारकीहोळी यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले कि, काँग्रेसवर होत असलेले आरोप हे धादांत खोटे असून, बंगळूरच्या कमिशनरना डी. के. शिवकुमार यांनी कोणतीही धमकी दिली नाही. त्यादरम्यान केवळ “ए मिस्टर” अशा पद्धतीने त्यांना हाक मारली, परंतु या गोष्टीचे अवडंबर माजवण्यात आले आणि धमकी असे संबोधण्यात आले. हा प्रकार योग्य नसून या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी असा आग्रह त्यांनी केला.
त्यानंतर बंगळूर येथे झालेल्या दंगलीप्रकरणी बोलताना ते म्हणाले कि, त्या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापण्यात आली असून याबाबतचा सत्य अहवाल सरकार दरबारी सादर केला जाईल. काँग्रेसवर करण्यात येणारे आरोप हे योग्य नसून गृहमंत्र्यांनी याबाबत केलेले विधान अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले, आणि सत्ताधाऱ्यांनी जबाबदारीने वागावे, असा सल्लाही त्यांनी दिला.