जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील या नेहमीच नागरिकांना सोयी – सुविधा पुरविण्यासाठी अग्रेसर असतात. तालुक्यातील विविध समस्यांच्या निराकरणासाठी विविध मागण्यांसह त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
एपीएमसी ते कंग्राळी खुर्द, हिंडलगा क्रॉस ते मण्णूर, वेंगुर्ला रोड ते उचगाव या रस्त्यांची दुरवस्था झाली असून येथून जा-ये करणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. कंग्राळी खुर्दच्या रस्त्याचे कामकाज हाती घेण्यात आले आहे परंतु ते अर्धवट स्थितीत आहे.
रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावीत तसेच मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे या रस्त्यांवर अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे, या रस्त्यांचे कामकाज त्वरित हाती घेऊन जनतेची सोय करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय तालुक्यात सध्या शेतीकामांना वेग आला असून बदलत्या वातावरणामुळे आणि सतत पाऊस-वारा अशा वातावरणात दिवसभर काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असे सामान्य आजार सतावतात. परंतु सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे या आजारांवर उपचार मिळणे कठीण झाले आहे.
अशातच अशा लक्षणांसाठी सर्वप्रथम कोविड चाचणी अनिवार्य ठरविण्यात येत आहे. खाजगी रुग्णालयात उपचार मिळेनासे झाले आहेत. आणि अनेक खाजगी रुग्णालयात १ लाख रुपयांची अनामत रक्कम मागण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी हे शक्य नाही. आणि सामान्य आजारांवर उपचार न मिळाल्यामुळे तालुक्यातील जनतेची गैरसोय होत आहे.
यासोबतच गरोदर स्त्रियांनाही उपचार वेळेत मिळत नाहीत, सर्वसामान्य आजारांसाठी मेडिकल्स मधून औषधेही मिळणे मुश्किल झाले आहे. हि सर्व परिस्थिती लक्षात घेता तालुक्यातील जनता तसेच शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने त्यांना योग्य ती उपचाराची सोय करून देण्यात यावी, अशी मागणीही सरस्वती पाटील यांनी केली आहे.