हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथील हटविण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती तात्काळ पुनश्च बसविण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. तसेच तशा आशयाचे निवेदन आज सोमवारी जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले.
शिवसेना सीमाभाग बेळगावतर्फे सेनेचे कर्नाटकातील सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणी वजा इशाऱ्याचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकार्यांनी निवेदनाचा स्विकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे दोन दिवसांपूर्वी छ. शिवाजी महाराजांची मूर्ती रातोरात हटविण्याचा जो प्रकार घडला त्याचा आम्ही धिक्कार करत आहोत. छ. शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत.
तेंव्हा त्यांची मूर्ती हटविण्याचे निंद्य कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. त्याचप्रमाणे रातोरात हटविण्यात आलेली मनगुत्ती गावातील शिवरायांची मूर्ती निश्चित केलेल्या जागी तात्काळपुनश्च प्रतिष्ठापित केली जावी अन्यथा नाईलाजाने शिवसेनेला तीव्र आंदोलन हाती घ्यावे लागेल, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
मनगुत्ती येथील शिवरायांची मूर्ती रातोरात हटविण्याच्या निंद्य कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. तसेच हटविण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्वरित बसविण्यात यावी, अन्यथा शिवसेना जोरदार आंदोलन छेडेल आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटतील, असा इशारा शिवसेनेचे कर्नाटकातील सहसंपर्कप्रमुख अरविंद नागनुरी यांनी “बेळगाव लाईव्ह”शी बोलताना दिला.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, सचिन गोरले, राजकुमार बोकडे, दीपक बेलुरकर, प्रकाश हेब्बाजी आदींसह बरेच शिवसैनिक उपस्थित होते.