Tuesday, January 7, 2025

/

संगोळी रायण्णांचा पुतळा अन्यत्र हलवा : ग्रामस्थांची मागणी

 belgaum

पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मध्यरात्री कोणत्याही परवानगीविना क्रांतिवीर संगोळी रायण्णांचा पुतळा बसविण्यात आला आहे.एकाच चौकात दोन पुतळे कशासाठी असा आक्षेप घेत याला मराठा समाजाने विरोध दर्शविला असून क्रांतिवीर संगोळी रायण्णांचा पुतळा अन्यत्र बसविण्यात यावा, अशी मागणी करत आज जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थ, मराठा समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि शिवसेनेने धाव घेतली.

मागील पंधरवड्यात हा पुतळा या भागातून हटविण्यात आला होता. परंतु कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि कोणालाही विश्वासात न घेता बाहेरील काही लोकांनी तसेच काही ग्रामस्थांच्या पुढाकारातून हा पुतळा या चौकात पुन्हा बसविला आहे. या पुतळ्यासाठी 1998 साली ग्रामपंचायतीच्या वतीने हि जागा रजिस्ट्रेशन करून खरेदी करण्यात आली होती. परंतु काही समाजजदुरभिमानी लोकांनी या जागी रायण्णांचा पुतळा बसवून वादाला तोंड फोडले आहे. रायण्णांबद्दल प्रत्येकाला आदर आहे. आणि त्यांचा पुतळा बसविण्यासाठी ग्रामस्थांचाही विरोध नाही. परंतु त्यासाठी दुसरी जागा नेमून दिली असता याच जागी तो पुतळा बसविण्यामागील हेतू काय? कानडी – मराठी वाद घडवून आणण्याचे हे षडयंत्र तर नाही ना? असा जाब जिल्हाधिकाऱ्यांना आज विचारण्यात आला.

यासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांची मराठा समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी भेट घेतली. क्रांतिवीर संगोळी रायण्णांच्या पुतळ्यासंदर्भात चर्चा करून पुतळा योग्य ठिकाणी बसविण्याची हमी मुख्यमंत्र्यांनीही दिली होती. परंतु तरीही हा पुतळा घाईगडबडीत बसविण्यात आला आहे. चौकात शिवरायांचा पुतळा असून त्यांचेच नाव या चौकाला दिले आहे. तर मग हा दुसरा पुतळा याचठिकाणी का बसविण्यात आला? संगोळी रायण्णांच्या पुतळ्यासाठी या चौकापासून काही अंतरावर जागाही मंजूर करून देण्यात आली आहे. तरीही येथेच हा पुतळा बसविण्याचा अट्टहास का? आणि कशासाठी? अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांना केली.

Meeting piranwadi statue
Meeting piranwadi st

मणगुत्ती येथेही कोणालाच विश्वासात न घेता रातोरात शिवरांचा पुतळा चौथऱ्यावरून हटविण्यात आला. त्यासंदर्भातही १५ दिवसांची मुदत सरकारने घेतली होती. परंतु १५ दिवस उलटूनही अजूनपर्यंत पुतळा बसविण्यात आला नसून पुन्हा पिरानवाडीत शिवरायांच्या पुतळ्यासमोरच रायण्णांचा पुतळा रातोरात बसविण्यात आला. यामागे मराठा समाजाविरोधात कोणता कट रचण्यात येत आहे का? काही मूठभर कानडी लोकांकडून पिरनवाडी गावात शांतता भंग करण्याचा प्रकार सुरु असून विनाकारण समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

यादरम्यान या शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या ८ दिवसात या प्रकरणावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून ग्रामस्थ, रायन्ना समर्थक आणि स्थानिक प्रशासनाची एकत्रित बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला पोलीस आयुक्त त्यागराजन, एसीपी नारायण बरमणी यांच्यासह पिरनवाडी गावचे प्रतिष्ठित नागरिक, मराठा समाजाचे नेते, शिवसेना नेते आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.